वसई : पोलीस ठाण्यामध्ये येणार्‍या नागरिकांकडून विविध कारणांसाठी पैसे उकळले जात असतात. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याला आळा घालण्यासाठी नालासोपारा येथील आचोळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ या धर्तीवर लाचखोरीविरोधात कडक निर्बंध घातले आहेत. कुणी लाच, वस्तू मागितल्यास थेट मला फोन करा अशा आशयाचा फलक लावून आपला नंबरच जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांचा अनुभव चांगला नसतो. विविध कारणांसाठी पोलीस नागरिकांकडून पैसे उकळत असतात. कधी गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन, कधी फिर्यादीला मदत करण्याचे कारण देत पैसे उकळले जात असतात. याशिवाय तपास करण्यासाठी, पोलीस ठाण्यात लागणार्‍या साहित्यासाठी, काम केले म्हणून चहापाण्याच्या नावाखाली आणि वर साहेबांना द्यायचे आहेत असे सांगून पैसे घेतले जात असतात. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. परंतु नालासोपारा मधील आचोळे पोलीस ठाण्यात आता अशा प्रकारांना चाप बसणार आहे. कारण या पोलीस ठाण्यात नव्याने आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी ‘न खाऊंगा ना खाने दूंगा’ असे धोरण अवलंबून सर्वांना पैसे न घेण्याची सक्त ताकीद दिली आहे.

हेही वाचा : वसई : फरार आरोपीला १२ वर्षानंतर अटक

एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी जागोजागी कुणालाही पैसे देऊ नका अशा आशयाचे फलक लावले आहेत. कुठलेही शासकीय काम करण्यासाठी आर्थिक मोबदल्याची आवश्यकता नसते. पण पोलीस ठाण्यातील अथवा बीट चौकीतील अधिकारी किंवा अंमलदार यांनी कुठल्याही प्रकारची आर्थिक मोबदल्याची रक्कम अथवा वस्तूच्या स्वरूपात मागणी केल्यास मला संपर्क करावा असा मजूकर लिहिला आहे. त्यासाठी पवार यांनी ठळक अक्षरात आपला खासगी मोबाईल नंबर दिला आहे. कुठलाही नागरिक मला थेट भेटायला येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : वसई विरारला सुर्याचे पाणी तात्काळ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; आगरी सेनेच्या महिलांचे आमरण उपोषण ६ व्या दिवशी मागे

पोलीस ठाण्यातील व्यवहार पारदर्शक असायला हवा. पोलिसांना शासनाकडून पुरेसे वेतन आणि सोयीसुविधा मिळत असतात. तरी देखील काही पोलीस नागरिकांची अडवणूक करून पैसे उकळत असतात. त्यामुळे असे फलक लावल्याचे आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले. पोलीस ठाण्यात कुणी आनंदाने फिरायला येत नाही. तर नागरिक त्रस्त असतात म्हणून येतात. त्यांना योग्य न्याय देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : ‘आरोग्यवर्धिनी’पाठोपाठ ‘आपला दवाखाना’चे लक्ष्य; राज्य सरकारच्या निर्णयामुळे महापालिकांपुढे दुहेरी आव्हान 

पोलिसांना लाच, पैसे, भेटवस्तू देऊ नका अशा आशयाचे लावलेले फलक आणि त्यावर थेट वरिष्ठ अधिकार्‍याचा मोबाईल क्रमांक असल्याने ह्या फलकाची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. आचोळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी या फलकाने धास्तावले आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai at achole police station police inspector balasaheb pawar display board outside his cabin saying that call me if the police ask for money css
First published on: 13-11-2023 at 16:14 IST