वसई: मागील वर्षभरापासून समुद्रातून मिळणाऱ्या मासळीची आवक घटली आहे. त्यापाठोपाठ आता अवकाळी हजेरी लावल्याने समुद्र किनाऱ पट्टीच्या भागात सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली आहे. त्यामुळे ऐन सुकी मासळी विक्रीच्या हंगामात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

दरवर्षी ऑक्टोबर पासून वसईच्या विविध भागातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासळी सुकविण्याचे काम सुरु होते. मात्र विविध प्रकारच्या निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे मासळी सुकविण्याचा व्यवसाय अडचणीत येत आहे. असे असतानाही काही महिला आजही आपल्या घराच्या ओटीवर, समुद्रकिनाऱ्यावर किंवा उन्हाची जागा मिळेल तिथे मासळी सुकवून त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून आपला संसार चालवित आहेत.

मात्र मंगळवारी रात्री सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पाचूबंदर, किल्लाबंदर, अर्नाळा, नायगाव कोळीवाडा येथे वलांडी वर मोकळ्या कोब्यावर सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली आहे. बोंबील, मांदेली व अन्य ओली मासळी सुकविण्यासाठी बांबूच्या परातीवर तसेच जेट्ट्यांवर ठेवलेली मासळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णतः खराब झाली असल्याचे सुक्या मासळी विक्रेत्या महिलांनी सांगितले आहे.

आता समुद्रातून फारशी मासळी येत नाही त्यामुळे सुकविण्यासाठी मासळी उपलब्ध होत नाही. जी काही मासळी मिळाली होती ती सुकविण्यासाठी ठेवली होती. जेणेकरून सुकल्या नंतर त्याची बाजारात विक्री करता येईल मात्र आता पावसानेच ऐन हंगामात अवकृपा दाखविल्याने मासळी भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी खराब झाल्यामुळे या महिलांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाकडून आर्थिक आधार मिळणे गरजेचे आहे यासाठी त्यांचे पाहणी करून योग्य ती मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निनाद पाटील यांनी केली आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी

वसईच्या किनार पट्टीच्या भागात सुक्या मासळी विक्रेत्या महिलांचे अवकाळीने नुकसान केले आहे. त्यांच्या नुकसानाची पाहणी करून आढावा घेण्याचे काम मत्स्यव्यवसाय विभागाने सुरू केले आहे. अर्नाळा यासह सर्वच किनाऱ्यावर जाऊन पाहणी केली जात असल्याचे परवाना अधिकारी विनोद लहारे यांनी सांगितले आहे. या आढावा घेऊन त्याचा अहवाल तयार करून पुढे पाठविला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.