वसई : वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ब्लॅक स्पॉटचे प्रमाण कमी झाले आहे.
सद्यस्थितीत चिंचोटी महामार्गाच्या हद्दीत एकही ब्लॅक स्पॉट नसल्याने ब्लॅक स्पॉट हे शून्यावर आले आहे. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरील दहिसर टोल नाका ते शीरसाड या चिंचोटी महामार्ग पोलिसांची हद्द आहे. सुरवातीला या हद्दीतील विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक होती. रस्ते ओलांडून प्रवास करणे, छेद रस्त्यातून वाहने टाकणे, वाहनांचा बेदरकार पणा,  धोकादायक वळणे यासह इतर भागात अपघात घडत होते.या अपघातात एकाच ठिकाणी  तीन वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याची ठिकाणे सुद्धा वाढली होती. अशा ठिकाणांना ब्लॅक स्पॉट निश्चित केले होते.

दहिसर पासून ते विरार फाट्यापर्यंत सुमारे १६ ठिकाणे ही ब्लॅक स्पॉट तयार झाली होती. मात्र त्यानंतर महामार्ग पोलिसांनी तयार झालेल्या ब्लॅक स्पॉटवर होणारे अपघात कमी करण्यासाठी वाहतूक नियमन, प्राधिकरण यांच्याशी संपर्क करून छेद रस्ते बंद करणे, मालजीपाडा येथे तयार झालेला उड्डाणपूल, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करणे, सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने प्रबोधन करणे अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे  २०१८ पासून ते २०२३ पर्यँत ब्लॅक स्पॉट होणाऱ्या अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. सद्यस्थितीत जे ब्लॅकस्पॉट निश्चित केले होते आता एकही ब्लॅक स्पॉट हा चिंचोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीत नाही अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. मॉर्थ ने ब्लॅक स्पॉटचे निकष ठरविले होते. त्यानुसार निश्चित केलेल्या ब्लॅक स्पॉट वर होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे असे महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : पालघर जिल्ह्यात रक्तटंचाई जिल्ह्यात ९ पैकी २ रक्तपेढीत रक्त उपलब्ध

६ ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकीकडे ब्लॅक स्पॉटचे प्रमाण शून्य असले तरी सातत्याने अपघात होणारी ६ ठिकाणे ही अपघात प्रवण क्षेत्र आहेत. गोल्डन तुलिप, सातीवली खिंड, साधना हॉटेल, बापाने उड्डाणपूल, रॉयल गार्डन, किनारा ढाबा अशा सहा ठिकाणी सातत्याने अपघात होण्याच्या घटना घडत आहेत.यावर्षी या अपघात प्रवण क्षेत्रात झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

ब्लॅक स्पॉट म्हणजे काय ?

राष्ट्रीय महामार्ग  व राज्य महामार्ग किंवा जिल्ह्यातील मुख्य रस्त्यावर पाचशे मीटर मागील सलग तीन वर्षात प्रत्येक वर्षी ५ प्राणांतिक अपघात व गंभीर अपघात घडले  असल्यास किंवा तीन वर्षात मिळून १० अपघाती मृत्यू झाल्यास अशा अपघात प्रवण क्षेत्रांना ब्लॅक स्पॉट असे म्हंटले जाते.