वसई:- वसई विरार- मिरा भाईंदर शहरात ठीकठिकाणी विना परवाना फटाके विक्रीची दुकाने उभारण्यात आली होती. विशेषतः काही दुकाने अक्षरशः दाटीवाटीच्या भागात होती. अशा विनापरवाना दुकानांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. यंदाच्या दिवाळीत ६१ विनापरवाना फटाके विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्याकडून ५ लाख ३८ हजारांचे फटाके जप्त करण्यात आले आहेत.

दिवाळीच्या काळात फटाके विक्री करण्यासाठी तात्पुरता स्वरूपात परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. याशिवाय अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाची परवानगी घ्यावी लागते. फटाके विक्रीसाठी वसई, भाईंदर परिसरात पालिकेने निश्चित केलेल्या जागेत फटाके विक्री साठी परवानग्या देण्यात आल्या होत्या.

मात्र तरी सुध्दा विनापरवाने बेकायेदशीरपणे फटाके विक्रीची दुकाने जागोजागी थाटली होती. शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर, फुटपाथ, रस्त्याच्या कडेला दुकाने उभारली आहेत. काही विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच ही दुकाने उभारल्याने त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

काही दुकाने ही अत्यंत दाटीवाटीच्या भागात ही होती. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. अशा विना परवाना फटाके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वसई- विरार, मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाने कारवाई केली आहे. आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात भाईंदर मध्ये ५ गुन्हे, वसईत ३२ गुन्हे, तर विरार मध्ये २४ असे एकूण ६१ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून ५ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी केलेली कारवाई

गुन्हे संख्याजप्त माल किंमत
परिमंडळ १४० हजार ५१७ रुपये
परिमंडळ २३२२ लाख ९९ हजार८३७
परिमंडळ ३२४१ लाख ९७ हजार ९६९
एकूण६१५ लाख ३८ हजार ३२३