वसई: विरारमध्ये कौटुंबिक वादातून एका इसमाने आपल्या सासूची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे हत्या करून पळून जाण्याचा तयारीत असलेल्या आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्याने तो पकडला गेला. विरार पूर्वेच्या साईनाथ नगर परिसरात मागील तीन महिन्यापासून प्रशांत खैरे हा पत्नी कल्पना खैरे , दोन मुलं व सासू यांच्या सोबत भाड्याच्या घरात राहत होता. प्रशांत याला मद्याचे व्यसन असल्याने मद्यपान करून पत्नी कल्पना खैरे व सासू लक्ष्मी खांबे यांना शिवीगाळ करून त्रास देत होता.

हेही वाचा: आरती यादव हत्या प्रकरण: आरोपी रोहीत यादवला २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी दुपारी प्रशांत मद्यपान करून घरी आला होता. त्यावेळी त्याची पत्नी कामासाठी मुंबईला गेली होती. प्रशांतचा सासू लक्ष्मी बरोबर वाद झाला. याच वादातून प्रशांत खैरे याने सासूचे हात पाय बांधून मानेवर व पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. हत्या करून प्रशांत पळून जाण्याच्या तयारीत होता. घरात असलेल्या मुलांनी दरवाजाला कडी लावून प्रशांत याला आत डांबले. व आजूबाजूला आरडाओरडा करून नागरिकांना गोळा करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. विरार पोलीसांनी या आरोपीला अटक केली आहे.