विरार : नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवी मंदिरात भाविकांची गर्दी होताना दिसते आहे. विरारच्या मारंबळपाडा येथील प्रसिद्ध सोनुबाई भवानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येत आहे. भवानी देवीसह नऊ देवींच्या असणाऱ्या मूर्ती हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्या नंतर हे मंदिर प्रसिद्ध झाले आहे.
विरार पश्चिमेला असणारा मारंबळपाडा परिसर हा वैतरणा खाडीच्या किनारी वसलेला निसर्गरम्य परिसर आहे. पूर्वेला डोंगररांगा, उत्तरेला वैतरणा खाडी आणि दूरदूरवर पसरलेले मोकळे रान आणि शेती यामुळे हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. यासोबतच इथे असणाऱ्या सोनुबाई भवानी मंदिरामुळे गेल्या काही वर्षांपासून हा परिसर प्रसिद्ध झाला असून इथे वसईसह पालघर, सफाळे, वैतरणा तसेच ठाणे जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर १०० हुन अधिक वर्षे जुने आहे.
देवीची मूर्ती शेततळ्यात सापडली होती असे इथले जुने जाणकार ग्रामस्थ सांगतात. देवीची वाघावर विराजमान असलेली मूर्ती पाषाणात कोरलेली असून वैशिष्टयपूर्ण आणि पुरातन आहे. पूर्वी भात शेतात छोटेखानी असणाऱ्या कौलारू मंदिर होते. २०१२ पासून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अध्यक्ष नरसिंह दादू पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली सोनूबाई भवानी देवी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सुरु करण्यात आले होते. २०२१ साली जीर्णोद्धार करण्यात आला. यामुळे मंदिराला भव्यता प्राप्त झाली. पंचक्रोशीतील डोंगरपाडा, मारंबळपाडा व नारिंगी गावांतील काही दानशूर मंडळी तसेच या तिन्ही गावांची सामाईक संस्था जय भवानी रेती उत्पादक सहकार संस्था यांच्याकडून मंदिरासाठी कायमच योगदान देण्यात आले आहे.
या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव, चैत्र नवरात्रोत्सव, जीर्णोद्धारसोहळा, वर्धापन दिन आदी विशेष प्रसंगी पंचक्रोशीतील तसेच पालघर, ठाणे ,रायगड या जिल्ह्यातून अनेक भाविक श्रद्धेने येत असतात. सध्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात गणपती, ग्रामदेवता ब्रम्हया देव व सोनुबाई भवानी देवीसह, एकविरा देवी, रेणुका देवी, सप्तशृंगी देवी, तुळजाभवानी देवी, कालिका देवी, महालक्ष्मी देवी, महिषासुरमर्दिनी देवी, शितला देवी अशा मूर्ती असल्याने भाविकांना एकाच ठिकाणी नऊ देवींचे दर्शन होत आहे.
नुकताच मारंबळपाडा आणि जलसार रो रो सेवा सुरु झाली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरीकांना सोनुबाई भवानी मंदिरात येणे सोयीचे झाले आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर रो रो सेवेचा वापर केला जातो. यामुळे इथून प्रवास करणारे पर्यटकही आवर्जून मंदिराला भेट देत आहेत. मंदिर मारंबळपाडा जेट्टीपासून जवळ असल्याने यावेळी भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे असे येथील स्थानिक भाविकाने सांगितले.