वसई-विरार पालिका क्षेत्रातील कर्णबधिर, गतिमंद तसेच कर्णदोष असलेल्या नागरिकांच्या अडचणी

प्रसेनजीत इंगळे

विरार :  करोना महामारी सुरू झाल्यापासून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन माध्यमातून केले जात आहे. लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. गतिमंद मुले तसेच श्रवणक्षमता कमी असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात श्रवणविषयक (ऑडिओमेट्री) चाचणी करणारी यंत्रणाच नसल्याने चाचण्या करता येत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेताना अडचणी येतात तसेच त्यामुळे त्यांच्या विकासावर विपरीत परिणाम होत असतात. कर्णबधिर विद्यार्थ्यांबरोबरच विविध प्रकारचे कर्णदोष असलेल्या नागरिकांनाही या चाचणी यंत्रणेअभावी त्रास सहन करावा लागत आहे.

२०१८ साली वसई-विरार महानगरपालिकेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे जिल्ह्यात एक तरी  श्रवणविषयक (ओडिऑमेट्री) चाचणी यंत्रणा केंद्र उभारले जावे यासाठी मागणी केली होती. सातत्याने दोन वर्षे त्यांनी ही मागणी लावून धरली होती. पण नंतर करोना आल्याने ही मागणी तशीच राहिली. याकडे अजूनही कोणी लक्ष दिले नाही. यामुळे अनेक विद्यार्थी याचा फटका सहन करत आहेत.

विद्यार्थी तसेच श्रावण दोष असलेल्या अन्य नागरिकांनासुद्धा याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. अपंगाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना मुंबईला अथवा ठाण्याला जावे लागते. सध्या पालघर जिल्ह्यात ८ हजार १६५ अपंग नागरिक आहेत. त्यातील ८२५ नागरिक कर्णबधिर आहेत. पण अजूनही अनेक नागरिक केवळ चाचणी यंत्रणा नसल्याने अनेक सुविधांपासून वंचित आहेत.

याबाबात माहिती देताना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांनी माहिती दिली की, श्रवणविषयक चाचणी (ओडिऑमेट्री) करण्यासाठी विशेष यंत्रणा लागतात. यासाठी एका विशिष्ट विटेपासून बनवलेली खोली लागते. यात बाहेरील कोणताही आवाज येता कामा नाही. प्युअर टोन ऑडिओ मीटरच्या सहायाने ही चाचणी केली जाते. त्यानुसार कमी-जास्त ऐकू आल्याच्या नोंदी घेतल्या जातात. पण सध्या ही यंत्रणा जिल्ह्यात नसल्याने मुंबईतील वांद्रे येथे चाचणीसाठी पाठविले जाते.  यासाठी आपण शासनाकडे मागणी केली आहे. लवकर कार्यान्वित केली जाईल.

वसई-विरार महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या माजी सभापती माया चौधरी यांनी माहिती दिली की, या यंत्रणेची नितांत गरज आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांची प्रगती दिसत नाही. यावेळी आपण त्याला ढ संबोधतो. पण त्याच्या अडचणी समजून घेत नाहीत. ऑनलाइन पद्धतीत सर्व खेळ हा ऐकण्याचा आहे. यामुळे मुलांच्या श्रवण क्षमतेची तपासणी होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास अनेक मुले विकासापासून दूर लोटली जातील अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील अपंगामध्ये अस्थिव्यंग असलेले ३२५९ लोक असून नेत्रविषयक समस्या असलेले ८७९ आहेत. भिषक समस्या असलेले १६०९ लोक असून कर्णबधिर लोकांची संख्या ८२५ इतकी आहेत तर १५९३ व्यक्ती मनोरुग्ण आहेत.

जिल्हा रुग्णालयाची स्थापना अजून झाली नाही, लवकरच ते काम सुरु केले जाईल त्यात श्रव्यतामिति (ओडिऑमॅट्री) ही यंत्रणा स्थापित केली जाईल

–  डॉ. राजेंद्र केळकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

 मी स्वत: याचा अनुभव घेत आहे. मला स्वत:ला एका कानाने ६० टक्के ऐकू येते, त्यात मी शिक्षिका असल्याने अशा मुलांचा त्रास मी जवळून पहिला आहे. यामुळे जिल्ह्यात एक तरी (ओडिऑमॅट्री) हि यंत्रणा स्थापन करणे गरजेचे आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासानाकडे मागणी केली आहे

माया चौधरी.  माजी सभापती महिला बाल कल्याण, वसई विरार मनपा