वसई: दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नालेसफाई व अन्य पूर नियंत्रण उपाययोजना झाल्या नसल्याचा प्रकार पाहणी दौऱ्या दरम्यान उघड झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी जाण्याच्या मार्गात कचरा, मातीभराव असल्याने पुन्हा एकदा महामार्गावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर पावसाळ्यात पावसाचे पडणारे पाणी वाहून जावे यासाठी नैसर्गिक नाले होते. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.

याशिवाय महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात माती भराव झाल्याचा परिणाम ही महामार्गावर जाणवतो. त्यामुळे दरवर्षी महामार्गावर जरासा पाऊस पडला तरीही महामार्ग पाण्याखाली जाऊन वाहतूक सेवा विस्कळीत होत असते. याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो.सातत्याने अशी समस्या निर्माण होत असतानाही प्राधिकरणाकडून लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस, प्रांताधिकारी शेखर घाडगे, शहर अभियंता प्रदिप पाचंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश साटम, संजय कुलकर्णी, उपायुक्त समीर भुमकर, श्दीपक झिंझाड, दिपक सावंत यासह पोलीस अधिकारी यांनी बुधवारी वर्सोवा पूल ( घोडबंदर) ते विरार फाटा या दरम्यान पाहणी  दौरा केला आहे. यात पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांची स्थिती जाणून घेतली. यावेळी विविध ठिकाणचे पाणी जाण्याचे मार्गात मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पाणी जाण्याचे मार्ग वेळीच मोकळे न केल्यास महामार्गावरील सखल भाग पाण्याखाली जाऊन पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता. पावसाळा सुरू होण्या पूर्वीच महामार्गालगतच्या नाल्यांची व कलव्हर्टची स्वच्छता करण्यात यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिल्या आहेत.

पाहणी दौऱ्याचा उद्देश संभाव्य ठिकाणी पाणी साचून राहू नये, यासाठी योग्य ती पूर्व तयारी करणे हा असून प्रशासनातील सबंधित सर्व विभाग त्यानुसार पुढील कार्यवाही तात्काळ सुरू करणार आहेत. – संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त  वसई विरार महापालिका

राडारोडा व कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विविध ठिकाणी रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गाने मुंबई व अन्य भागातील राडारोड्याने भरलेली वाहने महामार्गालगत खाली केली जात आहेत. वर्सोवा पुलापासून ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी, नायगाव, सातीवली फाटा, पेल्हार, विरार अशा विविध ठिकाणी हा राडा रोडा टाकून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राडारोडा वेशीवरच रोखण्यासाठी प्राधिकरणाकडून वर्सोवा पुलाजवळ चौकी तयार करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी अजूनही कर्मचारी नियुक्त न करण्यात आल्याने ही चौकी रिकामीच आहे. याशिवाय काही जण कारखान्यातील टाकाऊ कचरा, चिकन मटण दुकानातील कचरा कडेला आणून टाकला जात असल्याने हळूहळू महामार्गालगतच्या भागाची कचरा भूमी होऊन हे पूरस्थितीला कारणीभूत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

पावसाळ्यापूर्वी महामार्गावरील कामे पूर्ण करणार

महामार्गावर पाणी साचू नये यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जाणार आहेत. पाहणी दौऱ्या दरम्यान जवळपास १० ते १२ ठिकाणचे नाल्यात गाळ साचला असल्याचे दिसून आले आहे. पुढील आठवड्यापासूनच त्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले जाईल असे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. पावसाळ्यापूर्वीच सर्व स्वच्छता केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.