वसई: मागील काही महिन्यांपासून वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मध्येच अवजड वाहने बंद पडण्याच्या घटना घडू लागल्या आहे. बंद पडलेली वाहने हटविण्यासाठी तातडीने यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने वाहतूक कोंडी यासह इतर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई व गुजरात या भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून हलक्या, जड अवजड अशा वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु काही वेळा महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात वाहने तांत्रिक बिघाड होऊन रस्त्यातच बंद पडतात. मागील काही दिवसांपासून विरार फाटा ते वर्सोवा पूल या दरम्यान वाहने बंद पडण्याची घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होऊ लागली आहे. बंद पडलेली वाहने ही वेळीच रस्त्यातून बाजूला करणे गरजेचे आहे. परंतु अशी वाहने बाजूला करण्यासाठी महामार्गावर तातडीने कोणतीच यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

अनेकदा ही वाहने महामार्गाच्या पहिल्या किंवा मधल्या वाहिनीवर असतात. भरधाव वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पटकन ही वाहने बंद असल्याचे निदर्शनास येत नसल्याने अपघाताच्या घटना घडण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी अशा वाहनांना धडक बसून अनेक अपघात महामार्गावर झाले आहेत. रस्त्याच्या मध्येच बंद पडलेली वाहने काही वेळातच बाजूला करून मार्ग मोकळा करणे आवश्यक असते. मात्र तसे होत नसल्याने तासनतास ही वाहने जागच्या जागीच दुरूस्त होईपर्यंत उभी असतात. तसेच बंद पडलेली वाहने दिसून यावी यासाठीही कोणतेही सिग्नल व सूचक फलक ही लावले जात नाही केवळ झाडांच्या फांद्या अडकविल्या जात असल्याचे चित्र दिसून येत.

विशेषतः रात्रीच्या सुमारास अशी वाहने दिसून येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. महामार्ग प्राधिकरणाने आता तरी जागे होऊन बंद पडलेली वाहने वेळीच बाजूला करण्यासाठी विशिष्ट अंतरानूसार यंत्रणा उपलब्ध करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

प्राधिकरणाची यंत्रणा अपुरीच

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर बंद पडलेली वाहने हटविण्यासाठी तीन क्रेन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांची क्षमता २० टन इतकी आहे. परंतु ही यंत्रणा अपुरी असल्याने सेवा मिळण्यात अडचणी येत असतात. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक तसेच अवजड वाहनांची संख्या लक्षात घेता त्यांना सेवा देण्यासाठी अवजड क्षमतेची वाहने उपलब्ध करणे ही प्राधिकरणाची जबाबदारी आहे असे भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले आहे. नुकताच अपघात ग्रस्त वाहन बाजूला करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली होती असेही पाटील यांनी सांगितले आहे.

सेवा पुरविल्या जात असल्याचा दावा

महामार्गावर सुविधा पुरविण्यासाठी प्राधिकरणाकडून विविध उपाय योजना करण्यात येत असल्याचा दावा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. बंद पडलेली वाहने बाजूला करण्यासाठी क्रेनची सुविधा, रुग्णवाहिका अशा सुविधा उपलब्ध आहेत. तर तीन पेट्रोलिंग वाहने ही उपलब्ध आहेत असे प्राधिकरण व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. वाहन बंद पडल्याची तक्रार मिळताच आमच्याकडून सेवा तातडीने पुरविले जाते असेही चिटणीस यांनी स्पष्ट केले आहे तसेच खड्ड्यांमुळे जी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती त्या खड्ड्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.