४४ भूखंड आरक्षित असतानाही पालिकेकडून दहा वर्षांत एकही वाहनतळ नाही

विरार : वसई-विरार महानगरपालिकेने शहरातील वाहने उचलण्याची सोय केली आहे, पण मागील १० वर्षांत पालिकेने ४४ भूखंड आरक्षित करूनही एकाही अधिकृत वाहनतळाची निर्मिती केली नाही. यामुळे नागरिकांना बेकायदा वाहनतळासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. पालिका दरवर्षी आपल्या आर्थिक संकल्पात बहुमजली वाहनतळाची संकल्पना मांडते, पण प्रत्यक्षात मात्र याबाबत काहीही करताना दिसत नाही.   

वसई-विरार शहरांत लोकसंख्यावाढ झपाटय़ाने होत असताना शहरातील वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहनतळाची समस्या अधिक जटिल होत चालली आहे. शहरात पालिकेचा एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने बेकायदा वाहनतळांचे मोठे पेव फुटले आहे. अनेक भूमाफियांनी पालिकेचे वाहनतळ क्षेत्र गिळंकृत करत त्यावर अनेक विकासकामे केली आहेत. यामुळे शहरात वाहनतळाची सुविधाच उपलब्ध नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

वसई-विरार महानगरपालिकेने शहरात ४४ भूखंड हे वाहनतळासाठी राखीव ठेवले आहेत; पण त्यातील बहुतांश भूखंड अतिक्रमणाखाली आहेत. मागील १० वर्षांत हे अतिक्रमण हटवण्यात महानगरपालिका अपयशी ठरली आहे. अनेकवेळा पालिका केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार करत आहे, तर यातील काही राखीव भूखंड हे खासगी मालकीचे आहेत. याबाबतही पालिका त्यांना मोबदला देऊनही विकसित करत नाही. सध्या ४४ पैकी ४३ भूखंडांवर लहान-मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यासंदर्भात पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही.

पालिकेकडे ८७२ आरक्षित भूखंड आहेत. यात शाळा, खेळण्याची मैदाने, उद्याने, पोलीस ठाणे, कचराभूमी, शाळा, वाहनतळ, बसथांबे, बाजारपेठ आणि इतर सोयीसुविधांसाठी  राखीव ठेवण्यात आले आहेत; पण मागील काही वर्षांत पालिकेने या भूखंडांवर कोणतेही लक्ष न दिल्याने या भूखंडांवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे शहरातील अनेक शासकीय विकासाची कामे रखडली आहेत. पालिकेने मागील १० वर्षांत केवळ ७१ भूखंडांवरील अतिक्रमणे हटवून ते ताब्यात घेतले आहेत.  बाकी अजूनही अतिक्रमणाखाली आहेत.  शहराला वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असताना शहरात अधिकृत वाहनतळ नसल्याने जागोजागी बेकायदा पद्धतीने वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतूक कोंडीचा विळखा वाढत आहे. तसेच ‘पे अ‍ॅण्ड पार्किंग’मध्ये भरपूर पैसा मिळत असल्याने अनेक भूमाफियांनी बेकायदा वाहनतळ रस्त्यालगत उभे केले आहेत. यात नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत.

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहरात बहुमजली वाहनतळ उभे राहणार  आहेत; पण अनेक भूखंड हे खासगी मालकीचे असल्याने त्यांचे हस्तांतरण बाकी आहे. यामुळे अजूनही कोणतेही काम सुरूनाही.

राजेंद्र लाड, मुख्य शहर अभियंता, वसई-विरार महानगरपालिका