विरार : पाच दिवसांच्या पूरपरिस्थिती नंतर वसई विरार शहरात जनजीवन हळूहळू पूर्व पदावर येत आहेत. वाहतूक सेवेसह इतर सेवा सुरु झाल्याने गुरुवारी शहरात वर्दळ दिसून आली. शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने अखेर विश्रांती घेतली.

मंगळवार संध्याकाळपासून पावसाचा जोर कमी झाला होता मात्र तरीही बुधवारपर्यंत शहरातील पाणी ओसरले नव्हते. अखेर गुरुवारपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली. सकाळच्या वेळेत काही ठिकाणी पाणी असल्याने विरारसह इतर ठिकाणी ट्रॅक्टर सेवा सुरु होती. रस्त्यांवर रिक्षा कमी प्रमाणात धावत होत्या. तर पालिकेची परिवहन सेवा आणि एसटी महामंडळाची बससेवा सकाळीच सुरु झाली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

शहरातील शाळा दोन दिवसांनी गुरुवारी सुरु झाल्या. बसेसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला मात्र दुचाकीवर मुलांना शाळेत सोडायला गेलेल्या पालकांना ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागला. काहींच्या गाड्या रस्त्यातच बंद पडल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले.

वसई पूर्वेत मात्र वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आले. वसईतील पूर्व भागात अजूनही काही ठिकाणी पूर्णपणे पाणी न ओसरल्याने महापालिकेच्या बसेस एक ते दीड तास उशिराने धावत असल्याची माहिती परिवहन कर्मचाऱ्यांनी दिली. तर काही ठिकाणी पाणी भरलेले असल्याने रिक्षांची संख्या कमी होती. यामुळे वसई पूर्वेत कामानिमित्त आलेल्या प्रवाशांना बराच वेळ तात्कळत उभे राहावे लागत आहे. तर रिक्षासाठी अगदी रेल्वे पादचारी पुलाच्या पायऱ्यांपर्यंत प्रवाशांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले.

अजूनही बहुतांश भागात पाणी

पाऊस थांबला असला तरीही शहरातील विविध ठिकाणची गृहसंकुले व रस्ते अशा ठिकाणी पाण्याचा निचराच न झाल्याचे चित्र दिसून खारोडी विरार रस्ता, पालिका मुख्यालयासमोर, युनिटेक गृहसंकुल, नालासोपारा पूर्व, वसई पूर्वेतील वसंत नगरी गृहसंकुल, विशाल नगर गृहसंकुल यासह अन्य ठिकाणच्या भागात पाणी ओसरले नसल्याचे चित्र दिसून आले आहे. एव्हरशाईन अंबाडी रस्त्यांची उंची वाढविल्यामुळे वसंत नगरी भागातील गृहसंकुलात पाणी साचून राहत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

पाणी निचरा होण्यासाठी पंप सुविधा

वसई विरार शहरात ४४ ठिकाणी पाणी साचले होते. बहुतांश भागातील पाणी ओसरले आहे. पाणी निचरा होण्यासाठी जागोजागी महापालिकेने ६४ उपसा पंपाची सुविधा करण्यात आली आहे. खाडीला भरती असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

जागोजागी वाहतूक कोंडीचे विघ्न

पाणी ओसरल्यानंतर शहरातील रस्ते पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे चार दिवस घराबाहेर पडत न आलेले नागरिक आपली वाहने घेऊन दैनंदिन कामासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे गुरुवारी वसई उड्डाणपूल, नायगाव बापाणे रस्ता, विरार पूर्व, नालासोपारा अशा जागोजागी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.