वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर टोल नाका स्थलांतरणावरून वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शनिवारी ससूनवघर गावाजवळ परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान येथील स्थानिकांनी एकत्र येत या पाहणी दौऱ्याला तीव्र विरोध दर्शविला. महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडल्याने दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे बळी जात आहेत. आधी रस्त्यांची स्थिती सुधारा अशी घोषणाबाजी करीत स्थानिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, वसई विरार, पालघर, मिरा भाईंदर यासह सुरत व अन्य भागाला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचून राहणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी,  अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत होत्या. याचा मोठा फटका येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. विशेषतः पावसाळ्यात फारच अडचणी येत असतात. यासमस्या सुटाव्या यासाठी १२१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर काँक्रिटीकरण केले आहे. यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये इतका निधी खर्च केला आहे.

मात्र काँक्रिटीकरणानंतर येथील स्थिती सुधारेल अशी आशा नागरिकांना वाटले होते. परंतु काँक्रिटीकरणाचे काम ही अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खड्डे आहेत, तर अनेक ठिकाणी ओबडधोबड रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. तर काही वेळा महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजन शून्य कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होते. याचा मोठा फटका वाहनचालक यासह स्थानिकांना बसतो. नुकताच या कोंडीत रुग्णवाहिका अडकून दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. असे होत असतानाही त्याकडे महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

त्यातच आता मुंबईच्या वेशीवर असलेला टोल नाका स्थलांतरीत करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी महामार्गावरील वर्सोवा पुलाजवळ असलेल्या ससूनवघर भागात पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्याला येथील स्थानिकांनी जोरदार विरोध केला. याच वेळी पाहणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांना येथील नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले होते. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात घडतात, यात आमची माणसं जीव गमावतात. लहान मुलांचा मृत्यू झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात असा प्रश्न ही येथील नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.आधी रस्ते बनवा मगच बाकीचे बघा असेही येथील नागरिकांनी सांगितले. या भागात आम्ही टोलनाका उभारू देणार नाही अशी ठाम भूमिका ही नागरिकांनी मांडली आहे.

प्रताप सरनाईकांनी घेतला काढता पाय ?

टोलनाका संदर्भात पाहणीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपला ताफा घेऊन गेले होते. मात्र येथील ग्रामस्थांनी येथे टोल नाका होऊ देणार नाही अशा घोषणाबाजी करीत तीव्र विरोध केला. स्थानिकांची आक्रमकता व निर्माण झालेला गोंधळ यामुळे प्रताप सरनाईकांना ही त्याठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला.

सरनाईकांच्या ताफ्याला विरुद्ध दिशेने जाताना अडवले

शनिवारी टोल नाका स्थलांतरणाच्या जागेची पाहणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा ताफा वसईत दाखल झाला होता. मात्र, स्थानिकांनी केलेला विरोध आणि घोषणाबाजीमुळे त्यांना माघारी फिरावे लागले. तर यावेळी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या सरनाईकांच्या ताफ्यालाही स्थानिकांनी अडवले. तसेच नियम फक्त आमच्यासाठीच का? असा सवालही स्थानिकांनी यावेळी केला.