वसई-  मुंबई अमहदाबाद महामार्गावरील विरारजवळ अंगाडियाची गाडी अडवून सव्वा पाच कोटी रुपयांची रोकड पळविणार्‍या आरोपींना गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली आहे. यामध्ये अंगाडियाचा चालक तसेच या टोळीचा सुत्रधार मुरूगन याला समावेश आहे. मुरूगन हा धारावी येथील कुख्यात डॉन म्हणून ओळखला जातो. पोलिसांनी लुटीमधील ४ कोटी ८५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश मिळवले आहे.

१७ मार्च रोजी मुंबईच्या काळबादेवी येथे राहणारे श्रावण ठाकूर (२४) हे अंगाडिया आपल्या सहकार्‍यासह गुजराथ निघाले होते. रात्री ९ च्या सुमारास डोळ्यावर झोप येत असल्याचे सांगत चालक बाबू स्वामी याने  महामार्गावजवळील विरारच्या खानिवडे टोल नाक्याजवळ येऊन गाडी थांबवली होती. याच दरम्यान, त्यांच्या मागून आलेल्या एका वाहनातून ५ जण उतरले. पोलीस असल्याची बतावणी करत त्यांनी फिर्यांदी आणि त्याच्या सहकाऱ्याला मारहाण केली आणि ५ कोटी १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या लुटीच्या घटनेने खळबळ उडाली होती.

हेही वाचा >>>धुळवडीच्या दिवशी समुद्रात बुडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

या प्रकरणी गुन्हे शाखा ३ च्या पथकाने तपास करून चालक बाबू मोडा स्वामी (४८) याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीनंतर या प्रकरणात ४ जणांना अटक केली. त्या मध्ये मुरगननंद अभिमन्यू उर्फ मुरगन अण्णा (४६), बालाप्रभू शनमुगन (३९) आणि मनीकंडन चलैया (५०) यांना चौघांना अटक केली. तर दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून ४ कोटी ८७ लाखांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरेलेले वाहन आणि अडीच लाखांचे मोबाईल जप्त केले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ३ चे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, तसच अशोक पाचील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुखेश तटकरे, सागर बावरकर आदीच्या पथकाने या प्रकऱणाचा छडा लावला.

हेही वाचा >>>होळी, धुळवडनिमित्त लाखो लीटर थंडाईची विक्री, ताज्या थंडाईबरोबर ‘रेडी टू मेक’ थंडाईची विक्री ३१ टक्क्यांनी वाढली

डॉक्टरेट आणि हत्या प्रकरणात १० वर्ष तुरुंगात

या प्रकरणाचा सुत्रधार मुरूगननंद अभिमन्यू हा धारावी परिसरात मुरूगन अण्णा म्हणून प्रसिध्द आहे. एका हत्या प्रकरणात तो दहा वर्ष तुरूंगात राहून परतला आहे. या परिसरात त्याचा दबदबा असून विविध राजकारणी आणि सेलिब्रेटी त्याच्या वाढदिवस कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. त्याचे व्हिडियो यू ट्यूबवर अपलोड केलेले आहेत. त्याने एका विद्यापीठातून मानद डॉक्टरेट पदवी देखील मिळवली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. लुट केल्यानंतर आरोपींनी सायन येथील मुरूगनच्या घरात सर्व रोकड जमा करून पैशांचे वाटप केेले होते.