Maharashtra Board Class 10 Result 2025 Updates वसई: बारावी निकालाच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर झाला. या निकालात पालघर जिल्ह्यात वसई अव्वल आले असून वसईचा ९६.४८ टक्के इतका लागला आहे. उत्तीर्ण होण्यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. राज्य शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची परीक्षा मार्च महिन्यात घेतली होती.या परीक्षेसाठी वसई तालुक्यातून ३७ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३७ हजार ६९ इतके विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मंगळवारी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाने संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात दहावीचा निकाल जाहीर केला. 

यात वसईतून ३५ हजार ७६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १९हजार १९० मुलं तर १६ हजार ५७६ मुलींचा समावेश आहे. उत्तीर्ण होण्यात मुलींनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.  मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी  ९५.५० टक्के आहे तर मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.६४  टक्के आहे.तर तालुक्याचा  एकूण निकाल ९६. ४८ टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

पालघर जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वसईचा लागला आहे.निकालापूर्वी पालक व विद्यार्थी यांच्यात धाकधूक होती. मात्र निकालानंतर विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी व पालक यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे समाज माध्यमावर ही अभिनंदनाचा वर्षाव सुरू असल्याचे पहायला मिळाले.

मागील तीन वर्षांची निकाल आकडेवारी

२०२४-२५ –  ९६. ४८ टक्के

२०२३-२४ –   ९७.४१ टक्के

२०२२-२३ –   ९५.४५ टक्के

निकालाचा टक्का घसरला

मागील वर्षी प्रमाणे यंदाच्या निकालात ही वसईत मुलींनी बाजी मारली असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे मागील वर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का १ टक्क्यांनी घसरला आहे.