वसई:- मागील पाच महिन्यांपासून वसई विरार पालिकेतील नगररचना उपसंचालक पद रिक्त होते. अखेर सोमवारी राज्याच्या नगररचना विकास विभागाने आदेश जारी करत मनिष भिष्णूरकर यांची नगररचना उपसंचालक पदी नियुक्ती केली आहे.
मे महिन्यात तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्यावर बांधकाम घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ईडी) कारवाई केली होती. या कारवाईनंतर महापालिकेने ही त्यांचे सेवेतून निलंबन केले होते. तेव्हा पासून पालिकेतील नगररचना उपसंचालक पद रिक्त होते. त्यामुळे पालिकेतील बांधकाम परवानग्या यासह इतर प्रमुख कामे रखडली होती.
नगररचना विभागासाठी नवीन अधिकारी नियुक्त करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी शासनस्तरावर पत्रव्यवहार केला होता. अखेर पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्याच्या नगरविकास विभागाने वसई विरार महापालिकेच्या नगरचना उपसंचालक पदी मनिष भिष्णूरकर यांची नियुक्ती केली आहे. २० ऑक्टोबर रोजी तसे आदेश शासनाच्या नगररचना विभागाचे सहसचिव सुबराव शिंदे यांनी काढले आहे. नवनियुक्त झालेले भिष्णूरकर हे यापूर्वी सोलापूर महापालिकेत कार्यरत होते.
रखडलेली कामे मार्गी लागतील
ईडीच्या कारवाई नंतर नगररचना विभागातील कामकाज थंडावले होते. वसई-विरार महापालिका नगररचना विभागात अधिकारीच उपलब्ध नसल्याने नव्याने मंजुरीसाठी आलेल्या शेकडो फाईल्सवर निर्णय होत नव्हते तर दुसरीकडे महापालिकेत विकास आराखडा मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी अशी कामेही रखडली होती. आता नगररचना विभागात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.