वसई: नायगाव पश्चिमेच्या उमेळा फाटा रस्त्यालगत असलेल्या मजुरांच्या  झोपडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत मजूर कुटुंबाचा संसार जळून खाक झाला आहे. नायगाव पश्चिमेच्या उमेळा फाटा रस्त्यालगत मिठागर आहे.आता मीठ उत्पादनाची कामे सुरू झाल्याने या मिठागरात काम करण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून नागरिक स्थलांतर होऊन आले आहेत या मजुरांनी मिठागराच्या राहण्यासाठी झोपड्या उभारल्या आहेत. रविवारी अचानकपणे शंकर रेंजड या मजुराने उभारलेल्या झोपडीला भीषण आग लागल्याची घटना घडली.

या आगीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.  तर रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांनी गाड्या थांबवून तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच जयेश भोईर, रवींद्र रासम, जितेश कदम, प्रथमेश सावंत, नितीन भोईर या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून या आगीत हातावर पोट असणाऱ्या मजुरांचा संसार जळून खाक झाला आहे. ही आग लागली नसून कोणी तरी लावली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

घरा बाहेर पडल्यामुळे वाचलो…

शंकर रेंजड व त्यांचे सहकारी हे तलासरी येथून मिठागरात काम करण्यासाठी आले आहेत. त्यांनी लाकूड व गवत यापासून झोपडी तयार केली. रविवारी जेवण करून तीन जण मजूर झोपडीत झोपले होते. अचानकपणे झोपडीच्या वरून बाजूने फडफड असा आवाज आला. आग लागल्याचे समजताच तातडीने घराच्या बाहेर पडलो असे शंकर रेंजड यांनी सांगितले. परंतु आगीत आमचे कपडे, खाद्य साहित्य व पैसे जळून खाक झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जर झोपी गेलो असतो तर मोठी दुर्घटना घडली असती असे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सुद्धा ३० ते ३५ झोपड्या जळून खाक

वसई पश्चिमेच्या दत्तानी मॉलच्या मागील मोकळ्या जागेत मोल मजुरी करणारे बांधव झोपड्या बांधून राहत होते. वसई पश्चिमेच्या दत्तानी मॉलच्या मागील बाजूस असलेल्या झोपड्यांना १५ मार्च २०२५ रोजीरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यात ३० ते ३५ झोपड्या जळून खाक झाल्याने गोरगरिबांचे संसार उध्वस्त झाले होते.