भाईंदर : मिरा रोड येथील शांतीनगर भागात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे साचू लागले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरासह शाळा परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मिरा-भाईंदर महानगरपालिका राज्यात सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी प्रशासनाने वेळापत्रक आखले असून नियमित कचरा उचलला जात आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिकांनी दिवाळी निमित्त घरांची साफसफाई सुरू केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जुने फर्निचर, कपडे आणि प्लास्टिक साहित्य नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला टाकले जात आहे. मिरा रोड येथील शांतीनगर भागात शाळेच्या आवाराजवळ अशा प्रकारचे कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत.
हे ढिगारे मागील काही दिवसांपासून न उचलल्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच या ठिकाणाला अनेक नागरिक कचराकुंडी समजून अधिक कचरा टाकत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हा कचरा उचलण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिक सज्जी आयपी यांनी केली आहे.
दरम्यान, दिवाळीनिमित्त निर्माण झालेला कचरा त्वरीत हटवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.