भाईंदर :- मिरा-भाईंदर शहरातील नव्या इमारतींच्या बांधकाम स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने पाळावयाच्या नियमांकडे बांधकाम व्यावसायिकांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. परिणामी बांधकाम स्थळांवरील मलबा आणि धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरत असून प्रदूषणात मोठी वाढ होत आहे.

मिरा भाईंदर शहरात झालेल्या नागरीकरणामुळे महाराष्ट्र तसेच देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे शहरात गेल्या काही वर्षांत नव्या इमारतींच्या बांधकामात मोठी वाढ झाली आहे. मात्र या बांधकामांचा त्रास आता सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

बांधकामादरम्यान निर्माण होणाऱ्या धुळीमुळे वातावरण दूषित होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.वर्षभरापूर्वीच बांधकाम स्थळांवरून पसरणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन आणि महापालिकेने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यात धूळ नियंत्रण, मलब्याची सुरक्षित वाहतूक, २५ फूट उंचीचे पत्रे व जाळी बसवणे, बांधकाम साहित्य झाकून ठेवणे अशा विविध उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मात्र शहरातील बहुतांश बांधकामस्थळी हे नियम केवळ कागदोपत्री राहिल्याचे चित्र दिसत असून शहरातील प्रदूषणाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.

यामुळे रस्त्यांवर बांधकामस्थळांवरील मलबा सर्वत्र पसरत आहे.तर सिमेंट-काँक्रीट प्रकल्पांमधून उडणारी धूळ हवेत मिसळून वातावरण अधिकच प्रदूषित होत आहे. अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्याच्या कडेला टाकल्याने रस्ते अरुंद झाले असून पादचाऱ्यांना चालण्यासाठीही अडचण निर्माण होत आहे. काही भागांत वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढली आहे. शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पांबाबत नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागाकडून सांगण्यात आले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षच

मिरा-भाईंदर शहरात मागील काही महिन्यांपासून प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. शहरातील अनेक भागांत धुळीचा त्रास प्रकर्षाने जाणवत आहे. हे धुळीकण प्रामुख्याने सिमेंट-काँक्रीट प्रकल्पांतून निघत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मधल्या काळात महापालिका प्रशासनाने काही प्रकल्पधारकांवर कारवाई केली होती. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने धुळीचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

शहरातील बांधकाम प्रकल्पातून बाहेर पडणारी धूळ वातावरणात मिसळू लागल्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालवू लागली आहे. धुळीचे कण नाकावाटे फुफ्फुसात गेल्यामुळे सर्दी, खोकला, दमा व इतर श्वसनाचे आजार बळावू लागले आहेत. तर वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.