मिरारोड: मिरा भाईंदर महानगरपालिकेने पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सायकल मार्गिका उभारली होती. पण महापालिकेनेच या मार्गिकेवर अजब फतवा काढल्याने नेटकऱ्यांनी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सायकल मार्गिकेवर चक्क ‘सम तारखेला पार्किंग’ असा बोर्ड लावण्यात आल्याची एक चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे पालिकेची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
मिरा भाईंदर शहरात वाढलेल्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. तर यामुळे शहरात वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून पाऊले उचलली जात आहेत. यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून मिरा भाईंदर महानगरपालिकेला ३१ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. याच निधीचा वापर करून शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर सायकल मार्गिकेची उभारणी करण्यात आली.
यातील दीड किलोमीटरचा एक मार्ग मीरा रोड रेल्वे स्थानकापासून सुष्टी गृहसंकुलापर्यंत २०२१ साली तयार करण्यात आला होता. मात्र, वाढत्या पार्किंगच्या समस्यांमुळे आता महापालिकेनेच या सायकल मार्गिकेवर थेट ‘सम तारखेला पार्किंग’ करण्याचा बोर्ड लावला आहे.
या बोर्डाची एक चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात चित्रफीत बनवणाऱ्याने “सम तारखेला पार्किंग आणि विषम तारखेला सायकलिंग? कुठून येतात असे कारागीर ज्यांनी हा बोर्ड लावला आहे?” अशा शब्दांत महापालिकेच्या या अजब पार्किंग व्यवस्थेची खिल्ली उडवली आहे. तर दुसरीकडे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतंही काम पूर्ण न करण्याची शप्पथ घेतली आहे का?, ही सायकल मार्गिका तर सुरु होताच संपतेय, अशा अनेक खोचक आणि विनोदी प्रतिक्रियाही नेटकऱ्यांकडून या व्हायरल चित्रफितीवर उमटत आहेत.
