MBMC initiative / भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या ‘फराळ सखी’ उपक्रमाला आता ब्रँड म्हणून जागतिक पातळीवर विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये दिवाळी व्यतिरिक्त विविध धर्मांच्या प्रसिद्ध खाद्यसंस्कृतींचा समावेश करून या उपक्रमाची व्याप्ती वाढवली जाणार आहे.

महिलांना कायमस्वरूपी उद्योग, रोजगार आणि बाजारपेठ मिळावी यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने ‘फराळ सखी’ हा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या वर्षी महिलांनी बचत गटांच्या मदतीने सुमारे ३ टन फराळाची विक्री केली होती. याची दखल घेत केंद्र शासनाच्या नीती आयोगाने हा उपक्रम गौरवला होता. त्यानंतर नीती आयोगाच्या महिला उद्यम मंच आणि सेंटर फॉर एज्युकेशन, गव्हर्नन्स अँड पॉलिसी (सीईजीपी फाउंडेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवॉर्ड टू रिवॉर्ड’ हा उपक्रम राबविण्यात आला.

त्या अंतर्गत मिरा भाईंदरमधील निवडक २५ महिला उद्योजकांच्या गटाला व्यवसाय विकासासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून ८ उत्कृष्ट महिला उद्योजकांची निवड करण्यात आली. तसेच नीती आयोगाने या उपक्रमाला देशभर चालना मिळावी म्हणून मिरा भाईंदर महापालिकेला ‘नॉलेज पार्टनर ‘ म्हणून नियुक्त केले.

म्हणून उपक्रमाला मिळालेल्या या यशामुळे त्याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी घेतला आहे. आता केवळ दिवाळीपुरता फराळ न ठेवता भारतातील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक खाद्यपदार्थांचाही समावेश यात करण्यात येणार आहे.त्यामुळे वर्षभर मागणी राहील आणि अधिकाधिक महिलांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली आहे.

‘फराळ सखी’ला ब्रँड म्हणून विकसित करणार

‘फराळ सखी’ उपक्रमांतर्गत महिलांकडून स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार केले जातात. प्रयोग म्हणून मागील वर्षी महापालिकेने हे पदार्थ शहरातील विविध दुकाने आणि मार्केटिंग साइट्सवर विक्रीसाठी ठेवले होते. तयास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महापालिकेने याला आता ब्रँड म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनी कायद्यांनुसार नोंदणी करण्यात आली असून, प्रामुख्याने बाजारात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या प्रचलित कंपन्यांचा आदर्श समोर ठेवून हे काम केले जात आहे.

नुकतेच ‘फराळ सखी’ साठी पॅकिंग पद्धती निश्चित करण्यात आली असून त्यात वारली पेंटिंगला स्थान देण्यात आले आहे. देश-विदेशातील मोठ्या उद्योग समूहात या पदार्थांची देवाणघेवाण व्हावी यासाठी नीती आयोगाच्या बैठकीत प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त शर्मा यांनी सांगितले आहे.

स्वयंपाक गृहाची उभारणी

‘फराळ सखी’ उपक्रमाला बळ मिळावे यासाठी महापालिकेने स्वयंपाकघर उभारण्यासाठी महिलांना मिरा रोड येथील बस आगरात जागा उपलब्ध करून दिली आहे. येथे खाद्यपदार्थ तयार करण्यासोबतच पॅकिंगचीही सोय केली जाणार आहे.