भाईंदर – मराठी भाषिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिंदी भाषिक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केल्याचे दिसून आले.
मराठी भाषिक मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, सकाळी दहा वाजल्यानंतर मिरा रोड येथील बालाजी हॉटेल परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊ लागले. या वेळी घटनास्थळी येणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिक नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आंदोलकांत संताप उसळला. त्यातून परिसरात काही क्षणांतच तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांच्या कारवाईला विरोध म्हणून आंदोलकांनी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागून परिसरात विखुरले जात असल्याचे दिसून आले. काही वेळाच्या अंतराने ते बालाजी चौकात पुन्हा जमू लागले. मागील सुमारे तीन तासांपासून ही स्थिती सुरू असल्यामुळे परिसरात सतत तणावाचे वातावरण आहे.
परिस्थितीचा परिणाम म्हणून परिसरातील व्यापारी दुकानदारांनी आपली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली आहे. विशेष बाब म्हणजे, ज्यांच्या दुकानामुळे हा वाद निर्माण झाला ते जोधपूर मिठाई हे दुकानही सकाळपासूनच बंद आहे.