भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या मालमत्ता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली घेण्यासाठी त्यांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता वाढणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.महापालिकेच्या कामकाजात डिजिटल पद्धतीचा अधिकाधिक वापर करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
मागील दोन वर्षांत ‘ई-ऑफिस’सारखे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात महापालिकेला यश आले आहे. आता त्याचाच पुढचा टप्पा म्हणून, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्या डिजिटल यंत्रणेखाली आणण्याचा निर्णय आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी घेतला आहे.
महापालिकेच्या मालकीच्या अनेक वास्तू असून त्यापैकी काही भाडे तत्वावर देण्यात आल्या आहेत, ज्यातून प्रशासनाला उत्पन्न मिळते. तर काही वास्तूंच्या देखभाल व दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. याशिवाय मालमत्ता विभागाच्या ताब्यात असलेल्या व प्रस्तावित वास्तूंचीही मोठी यादी आहे. सध्या या वास्तूंचे कामकाज मिळकत तसेच अन्य विभागांमार्फत चालवले जाते. यामुळे संबंधित माहिती मिळवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते आणि कामाच्या पारदर्शकतेचा प्रश्न निर्माण होतो.हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेच्या सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सविस्तर माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार
महापालिकेच्या वास्तूंचे सर्वेक्षण करण्यासाठी लवकरच एका कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे. संबंधित कंत्राटदार या सर्व वास्तूंचे जिओ टॅगिंग करणार असून त्या मालमत्तांना डिजिटल यंत्रणेशी जोडले जाणार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून कोणतीही वास्तू, तिची स्थिती, वापर व देखभाल याविषयीची माहिती सहज मिळू शकेल, अशी माहिती आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली आहे.