भाईंदर : मिरा रोड येथील रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्याl रस्त्यावरील नाल्यावर महापालिकेने कंटेनर उभारून आरोग्य वर्धिनी केंद्राची उभारणी केली आहे. मात्र, सदर ठिकाणी दुर्गंधी, वाहतूक गैरसोय आणि इतर समस्यांमुळे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी आक्षेप नोंदवला आहे.
मिरा-भाईंदर शहरासाठी शासनाकडून एकूण ३५ आरोग्य वर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. या केंद्रांसाठी लागणारा खर्च शासनाकडूनच उपलब्ध करून दिला जात आहे. त्यानुसार महापालिकेने यापूर्वी १० केंद्रांची उभारणी केली होती, तर नव्याने १७ केंद्रे शहरातील विविध भागांत नुकतीच उभारण्यात आली आहेत. ही नवीन केंद्रे कंटेनरच्या स्वरूपात रस्त्याच्या कडेला उभारली जात आहेत.
याच अनुषंगाने नया नगर येथील रेल्वे रस्त्यालगतच्या नाल्यावर देखील एक केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, हे केंद्र उघड्या नाल्यावर उभारल्यामुळे त्या परिसरात डास, दुर्गंधी आणि अपघाताची शक्यता वाढली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, त्या ठिकाणी सावलीची सोय नसल्याने उन्हाळ्यात रुग्णांना गैरसोय होण्याची शक्यता असल्याचेही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे हे केंद्र अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात केंद्राची पाहणी करून आवश्यकता असल्यास ते पर्यायी ठिकाणी हलविण्यात येतील अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.
पालिकेचा अजब प्रकार
शहरात आरोग्य केंद्र हे सुसज्ज स्वरूपाचे असले पाहिजे. मात्र पालिकेने थेट नाल्यावरच आरोग्य केंद्र उभारल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तयार करण्यात आलेले केंद्र अशा ठिकाणी उभारले आहे की ते आरोग्य केंद्रच आजारी पडण्याची शक्यता आहे अशा प्रतिक्रिया देण्यात येत आहे.