भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ‘ग्रंथालय’ उभारण्यात येत आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे ग्रंथालय स्थापन होणार असून, येथे कर्मचारी वर्गासाठी वाचन आणि अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मिरा भाईंदर महापालिकेत मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा व्याप आहे. म्हणून कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन कामाच्या व्यापात थोडासा मानसिक विरंगुळा आणि ज्ञानवृद्धी साधण्यासाठी आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी हा उपक्रम राबवला आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचनाची आवड जोपासता यावी आणि कार्यालयीन वातावरणात एक सकारात्मक बदल घडावा, यासाठी ही पुढाकार घेण्यात आली आहे.

या ग्रंथालयासाठी आवश्यक पुस्तकांचा संच ‘रत्ननिधी’ संस्थेकडून भेट देण्यात आला आहे. या पुस्तकांमध्ये साहित्य, चरित्रे, विज्ञान, समाजविकास, अर्थशास्त्र तसेच प्रशासनाशी निगडित विविध विषयांचा समावेश आहे. तर एका सामाजिक संस्थेकडून फर्निचरची उभारणी करण्यात येणार असून, वाचनासाठी आरामदायी आणि आकर्षक वातावरण निर्माण करण्यात येत आहे.”या ग्रंथालयामुळे कर्मचारी वर्गामध्ये वाचनाची सवय वाढेल, तसेच कार्यालयीन तणावातून मानसिक शांती आणि प्रेरणा मिळेल. भविष्यात नागरिकांसाठीही अशा वाचन उपक्रमांचा विचार केला जाणार आहे,” अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान, ग्रंथालयाच्या उभारणीची प्राथमिक कामे सुरू असून, येत्या काही दिवसांत या वाचनालयाचे उद्घाटन केले जाणार आहे.

पुस्तके देण्याचे आवाहन

नव्याने उभारण्यात आलेल्या या ग्रंथालयात सर्व विषयांवरील पुस्तके उपलब्ध व्हावीत, म्हणून अधिकाधिक पुस्तके गोळा करण्याचे काम कर्मचाऱ्यांना दिले आहे. यासाठी महापालिकेच्या वस्तू पुनर्वापर केंद्रात आलेल्या पुस्तकांची देखील तपासणी केली जात आहे. याशिवाय, स्वेच्छेने पुस्तके देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनाही प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.