भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये घरगुती श्वान पाळण्यासाठी नागरिकांना आता महापालिकेकडून श्वान परवाना घ्यावा लागणार आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने नुकताच प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
गेल्या काही दशकांपासून शहरी भागातही श्वान पाळण्याची नागरिकांची आवड वाढली आहे. त्यामुळे विविध प्रजातींचे श्वान सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. यात स्वदेशी श्वानांबरोबर विदेशी प्रजातींचाही समावेश आहे. मात्र काही श्वानांचा स्वभाव आक्रमक असल्याने शासनाने काही जातींवर बंदी घातली आहे.मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांमध्ये श्वान परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानाधारक श्वानांचे लसीकरण अनिवार्य असून, मालकाची संपूर्ण माहिती स्थानिक प्रशासनाकडे नोंदवली जाते. त्यामुळे श्वानामुळे इतर नागरिकांना धोका पोहोचू नये, याची दक्षता घेता येते.
मात्र मिरा-भाईंदरमध्ये अद्याप असा कोणताही परवाना लागू नव्हता. शहरातील मोठ्या गृहसंकुलांत राहणाऱ्या नागरिकांकडेच श्वान पाळण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा श्वानांविषयी शेजाऱ्यांकडून पालिकेकडे वारंवार तक्रारी येत होत्या. मात्र कोणतीही अधिकृत नोंद नसल्याने प्रशासन हतबल होते. शिवाय, घरगुती श्वान व भटके श्वान यांच्या संघर्षामुळेही अनेकदा समस्या उद्भवत होत्या. त्यामुळे महापालिकेने आता श्वान परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनापुढे प्रस्ताव सादर
मिरा-भाईंदर महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने श्वान परवान्यासाठी धोरण तयार केले आहे. यात श्वानाचे नाव, प्रजाती, वय, लसीकरण तसेच मालकाची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे. या परवान्यासाठी वार्षिक ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.शहरात सुमारे ३० हजार घरगुती श्वान असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यास लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती महापालिकेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिली.
श्वान परवाना गरजेचा का?
शहरात घरगुती श्वान पाळल्यास त्यासाठी परवाना घेणे बंधनकारक असते. परवाना देण्यापूर्वी श्वानाचे लसीकरण व आरोग्य तपासणी केली जाते. तसेच श्वान मालकाची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध राहते. त्यामुळे एखाद्या श्वानाने चावा घेतल्यास अथवा हल्ला केल्यास गंभीर धोका कमी करण्यास मदत होते.