भाईंदर : मिरा रोड रेल्वे स्थानकाला लागून उभारलेल्या ‘स्कायवॉक’ ची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट झाली आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे पुलावरील जीने मोडकळीस आले आहेत, तसेच अस्वच्छता आणि श्वानांच्या वावराचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

मिरा रोड रेल्वे स्थानकाला लागूनच तीन मार्गांचा ‘स्कायवॉक’ पूल उभारण्यात आला आहे. प्रामुख्याने रेल्वे स्थानकावरून तीनही दिशांनी थेट रस्त्यावर उतरणारा हा पूल असल्यामुळे याचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्थानकाबाहेरील गर्दीचा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे.

मात्र, मागील काही महिन्यांपासून या पुलाच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. परिणामी पुलावर कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. इतकेच नव्हे, तर त्यामुळे पुलावर श्वानांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला असून महिला आणि वृद्ध प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय पुलावरील जीने मोडकळीस आले असून पावसाळ्यात ते निसरडे होतात, त्यामुळे प्रवासी पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या पुलाच्या देखभाल-दुरुस्ती कडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

फेरीवाल्यांचा त्रास कायम

मिरा रोड रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा त्रास अद्याप कायम आहे. हे फेरीवाले मोठी जागा व्यापत असल्याने प्रवाशांना नाईलाजाने उरलेल्या अरुंद मार्गाने प्रवास करावा लागतो.काही महिन्यांपूर्वी पुलावर बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात कारवाई मोहीम राबवली होती. मात्र, ही मोहीम काही दिवसांनंतर थंडावल्यामुळे पुन्हा फेरीवाल्यांचा त्रास जाणवू लागला आहे.तरी देखील, फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.