भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात कचरा संकलन करण्यासाठी ७० हजार रुपये प्रतिनग किमतीचे ५०० डबे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय साडेनऊ लाख रुपये प्रतिनग किमतीचे २१ स्वयंचलित डबेही घेतले जातील. एकूण ३,८८९ डब्यांच्या खरेदीसाठी १९ कोटी रुपयांचा खर्च होणार असून, महापालिकेने यास नुकतीच मंजुरी दिली आहे.
शहरातील स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी कचराकुंड्या उभारल्या आहेत. तसेच, गृहसंकुलांतून कचरा गोळा करण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या क्षमतेचे कचरा डबे बसवण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत डबे खराब झाले आहेत. त्यामुळे नव्याने डबे बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
डबे खरेदीसाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. त्याअंतर्गत ‘कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये एकूण ३,८८९ डबे खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र कंत्राटदाराने सादर केलेले दर पाहता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विशेषत:, स्टेनलेस स्टील पावडर कोटेड बिन्ससाठी प्रति नग किंमत ही ६६ हजार १८३ तर स्टेनलेस स्टील-अॅल्युमिनियम कोटेड बिन्ससाठी ही किंमत ६९ हजार ६६८ आहे. याशिवाय, ऑटोमॅटिक डब्याची किंमत ९ लाख ३४ हजार ५६० प्रतिनग असून, फायबर डबा ३४ हजार ५५१ प्रति नग अशी नमूद करण्यात आली आहे. या दरांशी तुलना करता, बाजारभावानुसार हे दर ७ ते ८ पट अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
डब्यांच्या सुरक्षेचे काय?
महापालिकेने साडेनऊ लाख रुपये प्रति नग किमतीचे नवे ऑटोमॅटिक डब्बे शहरात बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एवढ्या महागड्या डब्यांची सुरक्षा कशी आणि कोणाच्या जबाबदारीने केली जाणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महापालिकेने मंजूर केलेल्या डब्यांचे दर
डब्बा संख्या प्रति नग दर एकूण खर्च
स्टेनलेस स्टील- २ बिन ५०० ६६,१८३ ३,३०,९१,५००
स्टेनलेस स्टील -३ बिन ५०० ६९,६६८ ३,४८,४४,०००
ऑटोमॅटिक डब्बे २१ ९,३४, ६६० १,९६,२५,७६०
फायबर डब्बे २,८६८ ३४, ५१८ ९,९९,७८,४८०
अधिकाऱ्यांचा गोंधळ
महापालिकेने मंजूर केलेल्या ठरावाबाबत विचारणा करण्यात आली असता आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. तसेच बाजारभावापेक्षा अधिक दराने डबे खरेदी केले जात असतील, तर यासंदर्भात माहिती घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली. घनकचरा विभागाचे उपायुक्त सचिन बांगर यांनादेखील डब्यांच्या प्रति नग किमतीबाबत विचारले असता, प्रत्यक्ष दर कमी असून ठरावात नमूद दरांची माहिती घेतली जाईल, असे स्पष्ट केले.