वसई- पोलीस भरती प्रक्रियेतून निवड करण्यात आलेले ९४५ पोलीस कर्मचारी मिरा भाईदर आणि वसई विरारमधील विविध पोलीस ठाण्यात रुजू झाले आहे. यामुळे अपुर्या पोलीस बळाची अडचण दूर झाली आहे. सर्वाधिक पोलीस हे पेल्हार आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात मिळाले आहेत. तर मुख्यालयात २०० पोलीस नियुक्त करण्यात आले आहे.
मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या भेडसावत होती. त्यासाठी मागील वर्षी ९९६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांचे ९ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे पोलीस विविध पोलीस ठाणी, मुख्यालय, वाहतूक शाखा आणि गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण ९४५ पोलीस कर्मचारी विविध पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले असून त्यात ३०३ महिला पोलीस कर्मचारी आहेत.
परिमंडळ १ मध्ये काशिमिरा (३१), मीरा रोड (२५), प्रस्तावित काशिगाव (३९), भाईंदर (३७), उत्तन(२८), नवघर (३०) आणि नया नगर मध्ये (४७) पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परिंडळ २ आणि ३ मध्ये वसई (३०), माणिकपूर (१७), नायगाव (३४), तुळींज (३४), वालीव (३६), आचोळे (३३), पेल्हार (५५) विरार (३८) मांडवी (२०) नालासोपारा (५१) आणि मांडवी (३२) पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय गुन्हे शाखेत २५, वाहतूक विभागात ५०, मोटर वाहन विभागात २५ पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. २१८ पोलीस हे मुख्यालयातील विविध विभागात काम पाहणार आहेत.
हेही वाचा – चिंचोटी कामण-भिवंडी रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचे दोन तास रास्ता रोको
या नव्या पोलिसांच्या नियुक्त्यांमुळे पोलिसांचे बळ वाढणार असून आगामी लोकसभा, विधानसभा आणि त्या पाठोपाठ होणाऱ्या पालिका निवडणुका हाताळणे पोलिसांना सोपे जाणार आहे.