वसई : वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढू लागल्या आहे. नुकताच आचोळे पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. सागर मिश्रा (२२),सागर सुनील वर्मा (१९) त्यांच्या कडून विविध कंपन्यांचे २४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. वसई विरार शहरात मोबाईल चोरी, घरफोडी व सोनसाखळी चोरी अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. विशेषतः आता चालत्या गाडीवरून जाऊन पादचारी नागरिकांच्या हातातून मोबाईल लंपास करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ ऑक्टोबर २०२५ रोजी अमित दयाशंकर तिवारी हे आठवडी बाजारात जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या हातातील ओप्पो ए४९ मॉडेलचा मोबाईल हिसकावून नेला. त्याला विरोध केला असता चोरट्यांनी त्याच्या पोटात लोखंडी हत्याराने मारून जखमी केले. या घटनेनंतर आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला होता. घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर राजेश मिश्रा (वय २२) आणि सागर सुनील वर्मा (वय १९) या दोघांना नालासोपारा पूर्वेकडील डी-मार्टजवळून अटक केली आहे.चौकशीदरम्यान, आरोपींनी आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण २४ मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे २४ चोरीचे मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, पोलीस निरीक्षक अनंत पेडणेकर आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली आहे.
