वसई: महावितरणने मीटरचे प्रत्यक्ष गणन न घेताच ग्राहकांना सरासरी वीज देयके दिली आहेत. मात्र देण्यात वीज देयके अवाजवी असल्याची तक्रार वीज ग्राहकांनी केली आहेत. या वीजदेयकांची रक्कम कमी करण्यासाठी कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नायगाव परिसरात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. पण गेल्या काही काळात महावितरणकडून अनियमित वीजपुरवठा केला जात असल्याच्या तसेच अवाजवी वीज देयके आकारले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशातच नायगावमध्येसुद्धा असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. नायगाव कोळीवाडा आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मीटरचे प्रत्यक्ष गणन न करताच अंदाजे वीज देयक पाठवल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

त्यामुळे नागरिकांना सरासरी देयकांमुळे जास्त रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी देयक कमी करण्यासाठी वसई कनिष्ठ कार्यालयात धाव घेतली. मात्र, त्यांना नायगाव विभागीय कार्यालयातून यासंबंधी अहवाल आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना नायगाव ते वसई अशी धावपळ करावी लागत आहे. तसेच यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे नागरिक रमाकांत कोळी यांनी सांगितले आहे.

“मला अंदाजे बिलामुळे सहा हजार रुपयांपेक्षा जास्त देयक आले आहे. देयक कमी करण्यासाठी मी वसई कार्यालयात गेले असता त्यांनी नायगाव कार्यालयातून अहवाल आणायला सांगितला. मी नायगावला जाऊन अहवाल आणला, पण अजूनही देयक कमी झालेले नाही, अशी प्रतिक्रिया नायगाव येथील वैशाली कोळी यांनी दिली.

महावितरणच्या अजब कारभारामुळे यापूर्वीही असा मनस्ताप सहन करावा लागला होता. मीटर सुरू असतानाही अंदाजे देयक आकारणे ही बाब अन्यायकारक आहे. त्यामुळे महावितरणने पारदर्शक आणि अचूक देयक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.