विरार : Trailer fire near Virar on NH 48 मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार फाट्याजवळ असणाऱ्या सकवार येथे बुधवारी रात्री एका ट्रेलरच्या केबिनला आग लागली. अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास एका ट्रेलरला अचानक आग लागली. जीजे 0५ सीयु ८३२६ या क्रमांकाचा ट्रेलर बुधवारी रात्री गुजरातवरून मुंबईच्या दिशेने जात होता. ट्रेलर विरार फाट्याजवळील सकवार येथे पोहोचताच ट्रेलरच्या केबिनला अचानकपणे आग लागली. काही क्षणातच आगीचा भडका उडाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी मंदावली होती.
या घटनेची माहिती मिळताच आचोळे येथील वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. या आगीत संपूर्ण कॅबिन व पुढचे सर्व टायर, बॅटरी आणि इंजिन आगीच्या भक्ष स्थानी पडून आग पसरली होती.
अग्निशमन विभागाच्या जवानांना दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. चालक वेळीच केबिनमधून बाहेर पडल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती आचोळ्याच्या मुख्य अग्निशमन केंद्राकडून देण्यात आली आहे.
वाहनांची सुरक्षा ही महत्वाची
वाहनांच्या देखभाल करण्याकडे वाहनचालकांचे करण्याकडे दुर्लक्ष होत असते. यामुळे वाहनात काय तांत्रिक बिघाड आहे हे लक्षात येत नाही. याचा फटका बसून आग लागण्याचे प्रकार घडतात. याशिवाय काही वाहनात सीएनजी व एलपीजी किट असतात त्याचे मेंटेनन्स करणे महत्वाचे असून अधूनमधून याची वायरिंग व जॉईंट चेक करणं गरजेचं आहे.
परंतु याच्या दुरुस्तीकडे ही लक्ष न दिल्यास शॉर्ट सर्किट व गॅस गळती होऊन आग लागण्याची शक्यता आहे. यासाठी वाहनांची दुरुस्ती व त्याची देखभाल होणे आवश्यक आहे तसेच वाहनांत अग्निशमन करणारा सिलेंडर जर असेल तर जर छोटी आग असेल तर त्याचा भडका होण्याच्या अगोदर आग रोखली जाऊ शकते. व आगीमुळे होणारे नुकसान टळले जाऊ शकेल.