Mumbai Dahisar Toll Plaza / वसई : दहिसर टोल नाक्याच्या मुद्द्यावरून होणारा वादंग दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. एकीकडे मीरा-भाईंदरकरांना टोलनाका स्थलांतरणाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे हा टोल नाका वसईच्या हद्दीत आणला जात असल्याने वसईच्या भूमिपुत्रांनी टोल नाका स्थलांतरणाला कडकडून विरोध केला आहे.

मुंबईच्या वेशीवरील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा त्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ८ नोव्हेंबर रोजी टोलनाका स्थलांतरित केला जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली होती. पण जागा निश्चित नसल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे.

याच पार्श्वभूमीवर शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टोलनाका स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने वसईच्या हद्दीतील ससूनवघर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला. मात्र याच पाहणी दौऱ्यावेळी काँग्रेस नेते विजय पाटील, भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र जमून सरनाईकांच्या पाहणी दौऱ्याला कडकडून विरोध दर्शविला. तसेच वसईच्या हद्दीत टोल नाका होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली.

वसई हद्दीत टोलनाक्याला विरोध…

सरनाईक यांच्या दौऱ्याला स्थानिक भूमिपुत्रांनी कडकडून विरोध केला आहे. तसेच यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात एनएचएआय हाय हाय, खाली डोकं वर पाय, या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अशी घोषणाबाजी देखील केली. दहिसर टोल नाका हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ मार्गावर आहे.

तर वर्सोवा पुलाजवळून जाणारा मार्ग हा महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे कायद्यानुसार दहिसरचा टोल नाका वसईच्या हद्दीतील ससूनवघर येथे स्थलांतरित केला जाऊ शकत नाही. आम्ही हा टोलनाका होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक भूमिपुत्रांनी घेतली आहे. तसेच मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणारा टोल नाका वसईच्या उरावर का? असा सवालही स्थानिकांनी प्रताप सरनाईक यांना विचारला आहे.

स्थानिकांचा विरोधानंतर सरनाईक घेणार का माघार?

परिवहन मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्यात अपयश आले आहे. परिणामी प्रशासकीय यंत्रणेसह मंत्र्यांनी पथकर नाक्याची पाहणी करून आता १३ नोव्हेंबरची नवी मुदत दिली आहे. तसेच दिलेल्या मुदतीत पथकर नाका स्थलांतरित न झाल्यास शिवसेना शैलीत आंदोलन करण्याचा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. पण सरनाईकांच्या निर्णयानंतर भूमिपुत्रांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सरनाईक माघार घेणार का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

टोलनाका बेकायदेशीर?

दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरणाच्या मुद्दावरून भूमिपुत्र संघटना आक्रमक झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर एमएसआरडीसी  पथकर नाका बेकायदेशीर असल्याचे संघटनेचे सुशांत पाटील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार २०२७ सप्टेंबर पर्यंत दहिसर पथकर नाका बंद करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. 

तसेच जर हा नाका वर्सोव्याला झाला तर मुंबई-अहमदाबाद महामार्ग, ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर कोंडी होईल. हा पथकर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पण तो जर वर्सोव्याला स्थलांतरित झाला तर दहिसर न जाणाऱ्यांनाही विनाकारण टोल भरावा लागेल अशी तक्रार पाटील यांनी केली आहे.