भाईंदर:- सामाजिक तेढ निर्माण करणे तसेच खोटे आरोप करून समाज माध्यमांवर बदनामी केल्याचे आरोप करत काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी सह भाजपच्या १३ पदाधिकाऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात शंभर कोटीच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे.
मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी असलेल्या याकूब मेमेनला फाशीच्या शिक्षेतून सवलत द्यावी अशा आशयाच्या एका पत्रावर मुझफ्फर हुसेन यांनी स्वाक्षरी केली होती, असा आरोप भाजपाने मागील वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान केला होता. या संदर्भातील बनावट पत्र समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आले होते. त्यावरून ५ नोव्हेंबर २०२४रोजी भाजप पदाधिकारी जेराम डिसुजा, कुणाल शुक्ला, गणेश मुर्गन आणि अन्य २० जणांवर मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी देखील हुसेन यांची स्वाक्षरी असलेले बनावट पत्र एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमवार प्रसारीत केले होते.म्हणून त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता याच प्रकरणी मुझफ्फर हुसेन यांनी मुंबई उच्च न्यालयात मानहानी केल्याप्रकरणी शंभर कोटींचा खटला दाखल केला आहे. ‘निवडणूक काळात माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. याचा मुख्य हेतू समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा होता.म्हणून अशा १३ जणांनी केलेल्या खोट्या आरोपांचे पुरावे जमा करून आम्ही न्यायालयात खटला दाखल केला आहे. आणि मला विश्वास आहे की न्यालयाकडून न्यायमुळे आरोपींना शिक्षा दिली, अशी माहिती हुसेन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.