वसई: मागील अडीच वर्षांपूर्वी विरारच्या मारंबळपाडा येथे निसर्ग पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात आले होते. मात्र पुरेश्या प्रसिद्धीअभावी व पर्यटकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सद्यस्थितीत हे पर्यटन माहिती केंद्र धूळखात पडले आहे.

राज्यातील कांदळवन पर्यटनाला गती देण्यासाठी ‘निसर्ग पर्यटन गाव’ या संकल्पनेवर आधारित कांदळवन कक्षाने मुंबई महानगर प्रदेशातील विरारच्या मारंबळपाडा येथे निसर्ग पर्यटन क्षेत्र सुरू केले होते. महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाच्या मालकीच्या जागेवर हे केंद्र उभारले असून या केंद्रासाठी ४५ लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला होता. या केंद्रात मारंबळपाडा परिसराची ओळख, स्थानिक पक्षी व या भागात आश्रयाला येणारे पक्षी, जलचर प्राणी व त्यांची अन्नसाखळी, विविध कांदळवन प्रजातींची माहिती, या उपक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेली मत्स्यशेती, तसेच कचरा व इतर प्लास्टिक यापासून कांदळवनांचे संवर्धन अशा विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जात होती. परंतु या केंद्राची व पर्यटन ठिकाणांची हव्या त्या प्रमाणात माहितीच पर्यटकांना नसल्याने या भागात येणारे पर्यटन ही कमी झाले आहे. हे केंद्र कांदळवन समितीला चालविण्यास दिले आहे. मात्र पर्यटकच येत नसल्याने आता केंद्र बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सद्यस्थितीत या पर्यटन केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत उगविलें असून, परीसरात अस्वच्छता पसरली आहे. संपूर्ण भागाची दुरवस्था झाल्याची चित्र दिसून येत आहे. आणखीन काही काळ हे केंद्र असेच राहिले तर याची आणखीनच बिकट अवस्था होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

विरारच्या मारंबळ पाडा येथील निसर्ग पर्यटन केंद्र सुरू राहावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील उपाययोजना आखल्या जातील. – सागर आरडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग

पर्यटन फेरीबोटींची बिकट अवस्था

पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांना या परीसराची पर्यटन सफर घडविण्यासाठी बारा आसनी इंद्रायणी बोट सुरू करण्यात आली होती. मात्र या सफरीसाठी पर्यटकच येत नसल्याने या फेरीबोट बंद अवस्थेत असून त्या बोटीचीही बिकट अवस्था बनू लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसिद्धीची आवश्यकता

विरार मारंबळपाडा परिसर वैतरणा खाडीला लागूनच हा भाग असल्याने मोठ्या प्रमाणात या भागात कांदळवन क्षेत्र आहे. हा परिसर निसर्ग रम्य व जेट्टीचा भाग आहे.जर कांदळवन विभागाने तयार केलेल्या पर्यटन माहिती केंद्राकडे लक्ष देऊन त्याची योग्य ती प्रसिद्धी केल्यास पुन्हा येथे पर्यटक वळू शकतात.

रस्त्याचीही दयनीय अवस्था

मारंबळपाडा येथील या पर्यटक विकास केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यापैकी अर्ध्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले तर अर्धा रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजू दबल्या जाऊन मधोमध उंचवटा तयार झाला आहे. यामुळे इथे रात्रीच्यावेळी अपघातांची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले