वसई: वसई विरार शहरातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी पालिकेने आरोग्य केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात ११ नवीन आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. नुकताच त्याचे लोकार्पण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिकांना ४७७ आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आणि १४१ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्यापैकी वसई विरार महापालिकेला ६५ आरोग्य वर्धीनी केंद्र (आयुष्यमान आरोग्य मंदिर) आणि १५ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेतून ही केंद्र उभारली जात आहेत. यापूर्वी पालिकेने ३५ ठिकाणी आरोग्य केंद्र तयार केली होती. आता आणखीन नवीन ११ आरोग्य केंद्राची भर त्यात पडली आहे. ही आरोग्य केंद्र काशिद कोपर, नाईकपाडा, गास, सनशाईन गार्डन, भुईगाव, वाघोली, चांदीप, मांडवी, देवदळ, नायगाव कोळीवाडा आणि ससूनवघर या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहेत. नुकताच या केंद्राचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते मंत्रालयातून ऑनलाइन स्वरूपात लोकार्पण करण्यात आले आहे. आता आरोग्य केंद्राची संख्या ही ४६ इतकी झाली आहे.
अशा मिळणार सुविधा ….
या आरोग्य केंद्रातून बाह्य रुग्ण विभाग सेवा, दीर्घकालीन संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगाची तपासणी व प्रतिबंध उपाययोजना, एच.बी. (हिमोग्लोबिन), मलेरीया चाचणी (बि.एस. एम.पी.)युरिन प्रेगनन्सी रॅपिड टेस्ट, मधुमेह तपासणी, डेंग्यू चाचणी, लसीकरण अशा सुविधा नागरिकांना दिल्या जातील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. या आरोग्य केंद्रामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
