वसई : नालासोपार्‍यात क्षुल्लक वादातून एका नायजेरियन नागरिकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर मध्ये ही घटना घडली. लकी इकेचकव उईजे (३२) असे मृत्यू झालेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी २ आरोपी नायजेरियन नागरिकांना अटक केली असून तिसर्‍या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक राहत आहेत. नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथे त्यांची सर्वाधिक संख्या आहे. शनिवारी मध्यरात्री प्रगतीनगरच्या रोशन अपार्टमेंट येथील मोनू किराणा दुकाना जवळ तीन नायजेरियन बातचीत करत उभे होते. त्यावेळी त्यांच्या परिचयाचा लकी इकेचकव उईजे (३२) हा तिथे आला. काही वेळात त्यांच्यात क्षुल्लक बाबीवरून मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी दोघांनी लकी याच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी तुळींज पोलिसांनी तीन नायजेरियन नागरिकांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३(२), ३ (५) प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयूला बाबाजिदे बार्थलोम (५०), ओघेने इगेरे (४७) यांना अटक करण्यात आली असून ओडिया इझू पेक्यूलिअर (५०) हा फरार आहे.