Nitin Gadkari and Pratap Sarnaik/ भाईंदर: दहिसर पथकर नाका मुंबई-अहमदाबाद महामार्गावर स्थलांतरित करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नकार दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दहिसर पथकर नाका स्थलांतर करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रयत्न करत आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही परिवहन मंत्र्यांच्या या मागणीला दुजोरा दिला होता. या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नवीन ठिकाण शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वर्सोवा खाडीसमोरील मुंबई–अहमदाबाद महामार्गावर हा पथकर नाका हलवण्याच्या हालचाली करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लेखी पत्रव्यवहार केला होता.
दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांनी सरनाईक यांना उत्तर पाठवून राष्ट्रीय महामार्गावर हा पथकर नाका स्थलांतरित करण्यास परवानगी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पथकर नाका स्थलांतराचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. तर १३ नोव्हेंबर रोजी दहिसर पथकर नाका तात्पुरता सुमारे ५० मीटर अंतरावर हलवण्यात आला. त्यावेळी हा पथकर नाका पूर्णपणे स्थलांतरित होणार असल्याचा दावा प्रताप सरनाईक यांनी केला होता. मात्र या तात्पुरत्या बदलीनंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
पथकर नाका स्थलांतरावर काँग्रेसकडून आक्षेप
दहिसर पथकर नाका स्थलांतरावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एका जिल्ह्यासाठी उभारलेला पथकर नाका दुसऱ्या जिल्ह्यात हलवून तेथे वसुली करणे कायदेशीर नाही, असा नियम असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. त्यामुळे नाका दूरवर हलवण्याऐवजी जवळच असलेल्या जकात नाक्याच्या जागेवर तो हलवावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. सध्या त्या ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेने सभागृह उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असली, तरी अवजड वाहनांकडून कर वसुलीसाठी दोन वर्षांची मुदत बाकी असल्यामुळे, तात्पुरते तरी पथकर नाका तिथे हलवावा आणि सभागृह उभारणीचा निर्णय दोन वर्षांसाठी स्थगित करावा, असा सल्ला काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुझफ्फर हुसेन यांनी शासनाला पत्राद्वारे दिला आहे.
