वसई- नालासोपारा येथील कुख्यात गुंड राजकुमार गुप्ता उर्फ राजू बैल याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करून तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले. २०२४ या वर्षातील स्थानबद्ध करण्याची तुळींज पोलीस ठाण्याची पहिली आणि आयुक्तालयातील ही तिसरी कारवाई आहे.

नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथे राहणारा राजकुमार लालचंद गुप्ता उर्फ लालू बैल (३६) याच्या विरोधात नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात अमली पदार्थांची तस्करी, मारमारी, शस्त्र बाळणे आदी विविध गुन्ह्यात १३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची या परिसरात दहशत होती. फेब्रुवीर २०२१ मध्ये मोरेगाव नाका येथे पूर्ववैमनस्यातून ३ जणांनी तलवारीने हल्ला करून ५ राऊंड गोळीबार केला होता. या हल्ल्यात गुप्ता जखमी झाला होता. त्याच्या डोक्यात गोळी लागल्याने तो काही महिने रुग्णालयात कोमा मध्ये होता. रुग्णालयातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरू केले होते. त्याला पोलिसांनी हद्दपारही केले होते. मात्र तरी देखील त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरू होती. त्याच्याविरोधात पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअन्वये (एमपीडीए) स्थानबद्ध करण्याची तयारी सुरू केली. ही प्रक्रिय पूर्ण केल्यानंतर त्याला अटक करून त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे. परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले- श्रींगी यांच्या आदेशनाुसार अनिल शिंदे, आकाश वाघ आदी पोलीस कर्मचार्‍यांनी ही प्रक्रिया पार पाडली. या आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई कऱण्यात आली अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे यांनी दिली.

हेही वाचा – चंडिका देवी मंदिर उदवाहक दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर अशी कारवाई आवश्यक असते. ही प्रक्रिया किचकट असते आणि ती संयतपणे हाताळावी लागते. त्यानुसार आमच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली.

हेही वाचा – समुद्र स्वच्छता यंत्रणा वापराविनाच, स्वच्छतेअभावी किनाऱ्यांची दुर्दशा; लाखोंची यंत्र धूळखात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे एमपीडीए कायदा?

महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एपीडीए कायदा करण्यात आला. यात आरोपीला एका वर्षासाठी तत्काळ स्थानबद्ध (तुरुंगवास) करण्यात येते. याविरोधात केवळ उच्च न्यायालय व मंत्रालयात दाद मागता येते.