वसई:- विरार येथे विश्वकर्मा जयंती कार्यक्रमात अश्लील नृत्य आयोजित करणाऱ्या आयोजकाविरोधात बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी या कार्यक्रमातील अश्लील चित्रफित व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
विरार पश्चिमेच्या ॲव्हेन्यु ग्लोबलसिटी येथे मुकेश शर्मा (४५) याचे वेस्ट फर्निचरचे दुकान आहे. याच दुकानाच्या समोर बुधवारी विश्वकर्मा जयंतीनिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नृत्यासाठी महिला नर्तकीला बोलविण्यात आली होती. “संय्याजी दिलवा मांगेले गमछा बिछाईके ” या भोजपूरी गाण्यावर अश्लील नृत्य सादर केले. या नृत्यावर पैश्यांची उधळपट्टीही करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहे. या नृत्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित होताच नागरिकांमधून संतापाची लाट पसरली होती.
एका धार्मिक कार्यक्रमात अश्लील नृत्य करणे ही एक प्रकारची संस्कृतीची विटंबना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात होत्या. उत्सवाच्या नावाखाली असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही नागरिकांमधून करण्यात येत होती.
अखेर बोळींज पोलीसांनी आयोजक मुकेश शर्मा (४५) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३ (५) व मु पो ऍक्ट ११०,११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सवात वसई पूर्वेतील चिंचोटी परिसरातील श्री बजरंग मित्र मंडळाच्या मंडपात तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून अश्लील नृत्य करवून घेतल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणातली पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सुसंस्कृत वसई विरार शहरात असे प्रकार होत असल्याने स्थानिकांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.