वसई: मागील दोन दिवसापासून शहरात अतिवृष्टी सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे नालासोपारा येथील प्रगतीनगर परिसरात एका जीर्ण इमारतीचा सज्जा कोसळल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. हा सज्जा थेट खाली असलेल्या रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. नालासोपारा पूर्वेच्या भागात अमन अपार्टमेंट इमारत आहे. या इमारतीत अनेक कुटुंब राहतात. ही इमारत जुनी झाली असून काही भाग जीर्ण झालेल्या अवस्थेत आहे.

शहरात मागील दोन दिवसापासून सतत अतिवृष्टी सुरू त्यामुळे शनिवारी रात्री अचानकपणे या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरचा सज्जा कोसळून खाली उभ्या केलेल्या रिक्षावर कोसळला त्यामुळे यात रिक्षा चेंगरून गेली आहे. या घडलेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

यापूर्वी नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी साई राज अपार्टमेंट पंधरा वर्षे जुनी असलेली इमारत भर पावसात कोसळली होती. या इमारतीचा धक्का बाजूला असलेल्या कुसूम अपार्टमेंट व नरेंद्र माऊली या इमारतींना ही बसला.त्या इमारती सुद्धा पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने जीर्ण झालेल्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.