वसई: पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वसई विरार शहरात १ लाख बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. बुधवारी या बांबू रोप वाटप व लागवड उपक्रमाचा शुभारंभ वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यात शहरात आदिवासी बांधवांना मंजूर झालेल्या २४४ वनपट्ट्यावरील ८७.५४ हेक्टर क्षेत्रात या बांबूच्या रोपांची लागवड केली जाणार आहे.
पालघर जिल्ह्यात, वातावरण बदलाला तोंड देण्यासाठी आणि आदिवासी शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी बांबू लागवड करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वसई विरार भागातील जंगल पट्ट्यात ही मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली जाणार आहे.
पालिकेकडून स्वनिधींतून १ लाख बांबूची रोपे उपलब्ध करून दिली आहेत. याच बांबू रोपांच्या वाटप व लागवड कार्यक्रम बुधवारी विरार येथील महावीर धाम चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, आमदार राजन नाईक, महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी,ठाणे विभाग सामाजिक वनीकरण मुख्य वन संरक्षक के. प्रदीपा, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, विभागीय वनअधिकारी निरंजन दिवाकर, उपआयुक्त वृक्षप्राधिकरण स्वाती देशपांडे यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. सुरवातीला ज्या आदिवासी बांधवांना वनपट्टे मंजूर झाले आहेत त्यांना या रोपांचे वाटप करण्यात आले आहे. २४४ आदिवासी बांधवांचे दावे मंजूर झाले आहेत त्यांना प्रति हेक्टरी ६०० रोपांचे वाटप केले जाणार आहे.
तसेच वनविभाग मार्फत वनमहोत्सव या योजनेअंतर्गत १ लाख बांबूची रोपे वसई-विरार शहर महानगरपालिकेला उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ती बांबू रोपे पालिकेची उद्याने, आरक्षित भूखंड, स्मशानभूमी, गुरचरण जागा यासह विविध ठिकाणी बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने बांबू लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात बांबू या झाडाला मोठी मागणी असणार आहे. बांबू दरवर्षी ६० फुटापर्यंत वाढतो, त्यांची विक्री केल्यास चांगले मूल्य मिळेल आणि पर्यावरण संतुलन राखण्यास बांबूचा उपयोग होईल. तसेच महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर बांबू लागवडीचा मानस आहे. बांबूपासून इथेनॉल तयार व्हावा, ब्रिकेट तयार व्हावेत जे पेट्रोल आणि कोळशाचा पर्याय ठरतील असे वनमंत्री गणेश नाईक यांनी या कार्यक्रमा दरम्यान सांगितले.
