वसई :- ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे हवे असल्याने एका तरुणाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वसईत उघडकीस आला आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वडील आणि मुलाने मृतदेह दफन करून नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवले होते. मात्र गुन्हे शाखा २ च्या पथकाने २४ तासांच्या आत हा बनाव उघडकीस आणला.
आर्शिया खुसरु (६१) ही महिला वसई पश्चिमेच्या बाभोळा येथील पेरियार अपार्टमेंट मध्ये एकटीच रहाते. तिचे पती अमीर खुसरो हे पहिली पत्नी आणि मुलांसह वसई पूर्वेच्या गोखिवरे येथे राहतात. त्यांचा टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. मुलगा इम्रान खुसरु (३२) याला मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन होते. त्याला व्हीआरपीओ नावाचा गेम खेळण्यासाठी १ लाख ८० हजारांची गरज होती. त्याने हे पैसे सावत्र आई आर्शिया खुसरु कडे मागितले होते. परंतु तिने पैसे दिले नाही. त्यामुळे इम्रान शनिवारी बाभोळा येथील आर्शिया यांच्या घरी गेला आणि तिला लाथाबुक्क्याने मारहाण करून डोके आपटून हत्या केली.
मृतदेहाचे केले दफन..
हा प्रकार नंतर त्याने वडील आमिर खुसरु यांना सांगितला. त्या दोघांनी मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवले. एका डॉक्टरकडून मृत्यू दाखला घेतला आणि शनिवारी संध्याकाळीच घाईत धार्मिक रितीरिवाजात दफनविधी उरकून टाकला. रविवारी कामवाली बाई घरात आल्यानंतर तिला घरात रक्ताचे डाग दिसल्यानंतर संशय आला.
याबाबत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना माहिती देण्यात आली. कौशिक यांनी गुन्हे शाखा २ च्या पथकाला तपास करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखा- २ च्या पथकाने २४ तासात तपास करून आरोपी इम्रान खुसरु आणि वडील आमिर खुसरु या दोघांना अटक केली. त्यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ चे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरक्षक सागर शिंदे, पोलीस उपनिरक्षक अजित गिते आदींच्या पथकाने केली.