वसई: वसई पूर्वेच्या भागात ११ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. सकाळी साडेसात वाजल्यापासून  मतदानाला सुरवात झाली.  यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही मोठ्या उत्साहात मतदान केले. वसईत सायंकाळ  पर्यँत ८१.३१ टक्के इतके मतदान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसईतील खानिवडे, शिरवली , मेढे,  पोमण, शिवणसई, आडणे, उसगाव, माजीवली- देपीवली, चंद्रपाडा,  सकवार , भाताने  या ११ ग्रामपंचायतीमधील सरपंच व सदस्य पदासाठी रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.१३० जागांपैकी आधीच ८ सदस्यांची निवड ही बिनविरोध झाली होती. त्यामुळे १२२ जागासाठी ४७ मतदान केंद्रावर मतदान झाले. यात २९२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. करोनाच्या संकटकाळानंतर ग्रामीण भागात प्रथमच लागेली निवडणूक असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. सकाळ पासूनच विविध ठिकाणच्या मतदान केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत १८ टक्के मतदान झाले होते. मात्र नंतर मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावल्याने  दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी ५९ टक्के इतकी होती.

दुपार सत्रात कडाक्याचे ऊन असल्याने अनेक मतदारांनी घराबाहेर पडण्यास निरुत्साह दाखविल्याने मतदान केंद्रावरील गर्दी कमालीची घसरली होती .त्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारास पुन्हा मतदान केंद्राकडे उपस्थिती दर्शवत मतदानाचा हक्क बजावला. वसईत संध्याकाळ पर्यंत  ९ हजार ६१४  महिला व १० हजार ४३६ पुरुष  व इतर दोन अशा २० हजार ५२ नागरिकांनी मतदान केले असून वसईत ८१.३१% इतके मतदान झाले आहे. वसईतील ४७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्राच्या ठिकाणी कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी वालीव व मांडवी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके  नेमण्यात आली होती. दिव्यांग व वयोवृद्ध मतदार यांची  ने आण करण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 81 percent voter turnout in vasai gram panchayat election zws
First published on: 16-10-2022 at 23:08 IST