भाईंदर : मिरा भाईंदर महालिकेच्या परिवहन बस सेवेत उभे राहण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे प्रवाशांचा धोकादायक प्रवास सुरुच आहे. काही प्रवासी अक्षरशः लोकल प्रमाणे लटकून प्रवास करतात.यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे.मिरा भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा असून ती खासगी कंत्राटदाराच्या मदतीने चालवली जाते. सध्या महापालिकेच्या ताफ्यात ७५ डिझेल व ५५ इलेक्ट्रिक अशा एकूण १२९ बसगाड्या आहेत. या बसगाड्या मुंबई, ठाणे आणि मिरा भाईंदर अंतर्गत मिळून २६ मार्गांवर धावतात. यामधून दररोज एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार बस प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असते.यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये प्रवास करू लागल्याने अनेकदा प्रवासी दरवाज्यावर लटकून धोकादायक प्रवास करतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
मध्यल्या काळात हीं समस्या दूर करण्यासाठी परिवहन बस गाड्याचा फेर आढावा घेऊन रहदारीच्या मार्गांवर अधिक बस गाड्या सोडण्याचा निर्णय आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी घेतला होता.मात्र याची अंमलबाजवणी अजूनही झालेली नाही. परिणामी बस गाड्याची संख्या कमी असल्यामुळे प्रवासी जीव धोक्यात टाकून प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने भाईंदर ते इंद्र लोक, भाईंदर ते उत्तन, मिरा रोड ते रामदेव पार्क, मिरा रोड ते काशिगाव आणि मिरा भाईंदर च्या मुख्य मार्गांवर हा धोकादायक प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
बस गाड्या आगारात पडून
मिरा भाईंदर महापालिकेच्या बस गाड्या चालवण्याची जबाबदारी खासगी कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे.सदर कंत्राटदाराला वेळोवेळी बस गाड्याची देखभाल दुरुस्ती करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र असे असताना देखील कंत्राटदार याकडे दुर्लक्ष पणा करत आहे. परिणामी एकाच वेळी जवळपास तीस हुन अधिक गाड्या दुरुस्तीच्या कामा अभावी आगारात उभ्या असल्याचे समोर आले आहे.
