भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले आहे त्यामुळे सकाळी कामावर, शाळा-कॉलेजकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
मिरा-भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा खासगी कंत्राटदाराच्या मदतीने चालवली जाते. सध्या महापालिकेच्या ताफ्यात ७५ डिझेल व ५५ इलेक्ट्रिक अशा एकूण १२९ बसगाड्या आहेत. या बस शहरांतर्गत तसेच मुंबई व ठाणे मार्गांवर धावत असतात. यासाठी कंत्राटी पद्धतीने सुमारे ४५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून या परिवहन सेवेमधून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे बसची संख्या वाढवणे, डिजिटल सेवा उपलब्ध करणे, बस थांबे उभारणे यासारखी विविध कामे प्रशासनाकडून सुरू आहेत.
मात्र शुक्रवारी सकाळी महापालिकेची ही सेवा बंद असल्याचे समोर आले. यामुळे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
गेल्या काही वर्षांपासून परिवहन कर्मचारी महापालिकेकडे विविध मागण्या करत आहेत. यामध्ये वैद्यकीय सुविधा, दिवाळी सानुग्रह भत्ता व इतर बाबींचा समावेश आहे. महिन्याभरापूर्वी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाची भेट घेतली होती. त्यावेळी महापालिका प्रशासनाने एक महिन्याची मुदत मागितली होती. मात्र मुदतीनंतरही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी अखेर संप पुकारल्याचे समोर आले आहे.
सेवा सुरू झाल्याचा प्रशासनाचा दावा
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. त्यातील काही मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. मात्र प्रक्रिया पूर्ण होण्यास काहीसा वेळ लागत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी पुन्हा संवाद साधला आहे. परिणामी सकाळी दहा वाजल्यानंतर बस सेवा पुन्हा सुरू झाली, असा दावा परिवहन विभागाचे उपायुक्त सचिन बांगर यांनी केला आहे.परंतु दुपारी साडेबारापर्यंत अनेक भागांमध्ये बस सेवा सुरू झाली नव्हती, अशी तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली.