दुकाने दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी

वसई: टाळेबंदीचे निर्बंध कायम ठेवण्याच्या वसई विरार महापालिकेला मोठय़ा जनक्षोभाला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे आयुक्तांनी अवघ्या एका दिवसात निर्बंध कायम ठेवण्याचे आदेश मागे घेतले आहे. आता शहरातील दुकाने दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मागील महिन्यात राज्य शासनाने टाळेबंदी लागू करताना कडक निर्बंध लागू केले होते. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ अशा चार तासांसाठी परवानगी देण्यात आली होती. १ जूनपासून राज्य शासनाने टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केले होते. मात्र त्या शहराचा सकारात्मक दर १० टक्के आहे त्यांना स्वतंत्र घटक घोषित करून निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आदी शहरांनी टाळेबंदी शिथिल केले होते आणि दुकानांना दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र वसई विरार महापालिकेने जुना निर्णय कायम ठेवत निर्बंध शिथिल करण्यास नकार दिला होता. तसे पत्रक सोमवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आले होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. यामुळे मंगळवारी वसईच्या शहरी भागात दुकाने बंद आणि ग्रामीण भागात दुकाने सुरू अशी परिस्थिती होती.

पालिकेच्या या निर्णयाविरोधात मोठा जनक्षोभ उसळला होता. दुकाने खुली ठेवण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. मंगळवारी सकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली विविध व्यापारी संघटनांनी आयुक्त गंगाधरन डी. यांची भेट घेतली होती. वाढत्या दबावामुळे पालिकेने आपला निर्णय २४ तासात मागे घेतला आणि अत्यावश्यक सेवेतील दुकांनासह मॉल वगळता इतर दुकांनाना दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शहरात काय सुरू राहणार?

  • अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २.
  • अत्यावश्यक नसलेली दुकाने सकाळी ७ ते २ सुरू राहतील. मात्र शनिवार व रविवारी बंद राहतील.
  • शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील.
  • कृषी विषयक दुकाने आठवडय़ाच्या कामाच्या दिवशी म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील.
  • दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध असणार नाही. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही.
  • शहरातील करोनाची टक्केवारी जरी कमी होत असली तरी  दर शून्यावर यायला हवा. यासाठी  निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय होता. मात्र आता व्यापारी वर्गातून मागणी होत असल्याने र्निबधात शिथिलता आणून दुकानांन २ वाजेपर्यंत परवागनी देण्यात आली आहे.

-गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका