वसई : नुकताच नायगाव चिंचोटी येथील धबधब्याच्या डोहात मुंबईच्या गोरेगाव येथील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा घटना रोखण्यासाठी शनिवार आणि रविवारी नायगाव पोलिसांनी पर्यटन स्थळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यांच्याद्वारे येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा माघारी पाठविले जात आहे.

वसई तालुक्याचा परिसर निसर्गरम्य असा परिसर असून या भागात समुद्र किनारे, छोटेमोठे धबधबे आहेत.  पावसाळा सुरू झाल्याने नद्या, धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार अशा विकेंडला मोठ्या संख्येने पर्यटन ही या ठिकाणी पर्यटनासाठी येऊ लागले आहे. मात्र काही अतिहौशी पर्यटक मद्यपान करून पाण्याच्या प्रवाहात जाणे, स्टंट बाजी करणे, उंच ठिकाणाहून पाण्यात उडी मारणे, तर काहींना ठिकाणांची माहिती नसताना ही पाण्यात उतरतात त्यामुळे बुडण्याच्या घटना, प्रवाहात अडकून पडण्याच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) (२)मनाई आदेश लागू केले आहेत. याशिवाय सूचना फलक ही लावण्यात आले आहेत.

मात्र तरी सुद्धा बंदी झुगारून व छुप्या मार्गाने वाट काढत पर्यटन स्थळी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकताच मुंबईच्या गोरेगाव येथून सहा तरुणांचा गट १४ जुलै रोजी चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी आला होता यातील दोन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नायगाव पोलिसांनी सतर्कता राखत चिंचोटी, देवकुंडी कामण, यासह अन्य भागातील नद्या व धबधबे अशा ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सदर ठिकाणावरून पर्यटक यांना येण्यास मज्जाव केलेला असल्याचे नायगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी सांगितले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चिंचोटी, देवकुंडी व इतर धबधबा किंवा ओढ्यामध्ये येऊ नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.