‘गुगल पे’ वरून ३ हजारांची लाच स्विकारणार्‍या एका पोलिसाला मुंबईच्या लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने अटक केली आहे. मंगेश नामदेव राक्षे (४२) असे या पोलिसाचे नाव असून तो मिरा रोड येथील काशिगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदार हे वाहनचालक आहेत. मंगळवार ११ सप्टेंबर रोजी ते कल्याण येथून परतत असताना काशिमिरा येथे त्याचे वाहन बंद पडले होते. ते वाहन त्यांनी रस्त्याच्या कडेला उभे केले होते. त्याचवेळी काशिगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मंगेश राक्षे या पोलीस शिपायाची दुचाकी या वाहनाला धडकली. त्यामुळे राक्षे आणि तक्रारदार वाहनचालक यांचा वाद झाला.

हेही वाचा >>> जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

राक्षे याने तक्रारदाराचा वाहन परवाना काढून घेतला आणि तो परत हवा असल्यास १० हजार रुपयांची लाच देण्यास सांगितले. तक्रारदाराच्या बॅंक खात्यात त्यावेळी ३ हजार रुपये होते. राक्षे याने ते ३ हजार रुपये एका पानवाल्यास गुगल पे द्वारे पाठवायला सांगितले. मात्र बुधवारी राक्षे याने पुन्हा तक्रारदाराकडे उर्वरित ७ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने वरळीच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेकडे याबाबत तक्रार केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने तक्रार प्राप्त होताच सापळा लावला. मात्र सापळा लावता असताना राक्षे याला संशय आला होता. परंतु लाचलुचपत खात्याच्या पोलिसांनी राक्षे याला रंगेहाथ अटक केली. राक्षे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या मुंबई विभागाचे  सहाय्यक आयुक्त रवींद्र बाबर, पोलीस निरीक्षक अविनाश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.