विरार :- वसई विरार शहरात जलवाहिन्या अंथरण्यासाठी जागोजागी खणलेल्या रस्त्यांची दुरुस्ती निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे. त्यामुळे दुरूस्त केलेले रस्त्यावर पुन्हा एकदा खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यांची उंच सखल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
वसई विरार शहरात पालिकेने पाणी पुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी जलवाहिन्या अंथरण्याचे काम हाती घेतले होते. यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले होते. जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करून पूर्ववत करण्यात आले होते. मात्र ठेकेदाराकडून करण्यात आलेली दुरुस्ती ही निकृष्ट दर्जाची असल्याने रस्त्यांची उंच सखल स्थिती झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्नाळा , गिरीज -वसई रस्ता, नायगाव- पापडी रस्ता, मुळगाव, भुईगाव, विरार ते विरार फाटा मुख्य रस्ता यासह अन्य रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यावर ठेकेदाराने वरचेवर दगड टाकून त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते.
त्यामुळे अवघ्या काही दिवसातच तेथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत तर काही ठिकाणी उंच सखल अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.ठेकेदाराने त्यांचे काम पूर्ण केले परंतू रस्त्यांची थातुरमातुर दुरुस्ती करून दिली त्यामुळे अशा रस्त्यावरून ये जा करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे काँग्रेसचे समीर वर्तक यांनी सांगितले आहे.
पालिकेने रस्त्यांची दुरुस्ती केल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक होते मात्र तसे न झाल्याने आज ही स्थिती निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. पालिकेकडून आता रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत त्यातून हेही रस्ते योग्य रित्या दुरूस्त करण्यात येतील असे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.