विरार : वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या कामण- चिंचोटी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. विशेषतः या खड्ड्यात अडकून मालवाहतूक वाहने कलंडून अपघात घडू लागले आहेत. नुकताच या मार्गावर अवजड मालवाहतूक कंटेनर कोसळून अपघात घडला.वसई पूर्वेच्या भागातून चिंचोटी – कामण ते भिवंडी असा २२ किलोमीटरचा राज्य महामार्ग गेला आहे. ठाणे भिवंडी यासह अन्य विविध भागांना जोडणारा हा महत्वाचा महामार्ग आहे. विशेषतः मालवाहतूकिच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जातो.
मात्र मागील काही वर्षांत रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी दीड ते दोन फूट खोल इतके मोठे खड्डे तयार झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ही हे खड्डे अधिकच धोकादायक ठरत आहे. सातत्याने या मार्गावर खड्ड्यामुळे अवजड वाहनांचा तोल जाऊन कलंडू लागली आहेत. सातत्याने अशा घटना या रस्त्यावर घडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. नुकताच एक मालवाहतूक कंटेनर चिंचोटी कामण मार्गावर कलंडला होता. यात मोठ्या प्रमाणात वाहनाचे नुकताच झाले आहे.
यापूर्वी सुद्धा अशा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. खड्ड्यामुळे वाहनांचा समतोल राहत नसल्याने असा प्रकार घडतो. विशेषतः जेव्हा ही अवजड वाहने जातात तेव्हा त्याच्या बाजूने वाहन घेऊन जात असताना कधी असे वाहन अंगावर तर कोसळणार नाही ना अशीही भीती असते असे सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.यासाठी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.